सिन्नर : तालुक्यातील डुबेरे येथील श्रीमंत थोरले बाजीराव नागरी सहकारी पतसंस्थेला सहकार क्षेत्रातील राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार राज्याचे सहकार आयुक्त सतीश सोनी यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण वाजे, कार्यकारी संचालक भीमराव चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे उपस्थित होते. रविवारी (दि.१) नागपूर येथे पार पडलेल्या सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्रमात हा पुरस्कार वितरित करण्यात आला. ५० ते १०० कोटी ठेवी वर्गवारीमध्ये श्रीमंत पतसंस्थेने सभासदांचा विश्वास प्राप्त करून भरीव असे काम सहकार क्षेत्रात केल्याने पतसंस्थेची नाशिक विभागीय क्षेत्रातून निवड झाली आहे. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.सहकार क्षेत्रात नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पतसंस्थेने सभासद व संस्थेचे संचालक मंडळ आणि हितचिंतक यांच्या विश्वासाने हा पुरस्कार संस्थेस मिळाल्याने संस्थेची जबाबदारी यापुढे वाढली असून, एक आदर्शवत पतसंस्था म्हणून सहकार क्षेत्रात संस्थेकडे बघितले जाते याचा अभिमान वाटतो, असे यावेळी नारायण वाजे यांनी स्पष्ट केले.आमदार राजाभाऊ वाजे, मविप्रचे संचालक हेमंत वाजे, महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक कार्याध्यक्ष अंबादास वाजे, रामनाथ पावशे, अरुण वारूंगसे, सरपंच सविता वारूंगसे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष निशा वारूंगसे, सिन्नर पंचायत समिती उपसभापती संगीता पावशे, माजी उपसभापती शंकर वामने यांनी संस्थेस प्राप्त पुरस्काराबद्दल संचालक मंडळ व संस्थेतील प्रत्येक घटकाचे कौतुक केले.
डुबेरेच्या श्रीमंत पतसंस्थेस दीपस्तंभ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 6:31 PM