नाशिक : मराठा आरक्षणाला सर्वाेच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर समाजात उफाळून आलेला असंतोष आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने निर्णय घेऊन दिलासा देण्याचा केलेला प्रयत्न यासंदर्भात चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची शनिवारी (दि. २६) नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीस खासदार संभाजीराजे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.मराठा आरक्षणाच्या लढ्यात नाशिकमधील कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होत असलेल्या याबैठकीची तयारी करण्यात आली आहे. नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील मधुरम हॉलमध्ये ही बैठक सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. बैठकीस राजेंद्र कोंढरे, वीरेंद्र पवार यांच्यासह समाजातील अन्य ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक असे दोनशे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर महाराष्टÑ शासनाने काही निर्णय जाहीर केले आहेत. मात्र, या निर्णयावरदेखील समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या संमिश्र प्रतिक्रियांमुळे मराठा समाजातील सामान्य नागरिक संभ्रमीत झाला आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाची दिशा भरकटू नये यासाठी आधी संभ्रम दूर करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.