नाशिक : राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी रविवारी (दि. १६) जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन म्युकरमायकोसिसबाबत सविस्तर चर्चा करुन त्यापासून बचावासह उपचारांबाबतचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीला वेग देण्याचे निर्देशदेखील दिले.
जिल्हा रुग्णालयात रविवारी आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील आणि अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार यांनी भेट देऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच म्युकरमायकोसिससाठी गठित समितीच्या माध्यमातून हा आजार होऊ नये, यासाठीच्या उपाययोजना, झाल्यास काय करावे आणि सर्जिकल उपचार याबाबत विस्तृत अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. लवकरात लवकर हा अहवाल तयार करुन आरोग्य विभागाकडे पाठविण्यास सांगण्यात आले. तसेच कोरोनाच्या पुढील टप्प्यातील लाटेसाठी सज्ज राहण्यासाठीच्या उपाययोजनांची त्वरित अमलबजावणी करण्यास सांगितले. जिल्ह्यात २००हून अधिक बेडची ४ हॉस्पिटल्स निर्धारित करुन तिथे सिव्हीलव्यतिरिक्त चोख बंदोबस्त करण्याच्या निकडीवर भर देण्यात आला. तसेच ऑगस्टमध्ये किंवा त्यानंतर येऊ शकणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी बालरोगतज्ज्ञांकडील व्यवस्थांमध्ये वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच बालरोगतज्ज्ञांचे एक पथक तयार करुन त्या पथकाच्या माध्यमातून यंत्रणेत आवश्यक ते सर्व बदल लवकरात लवकर करुन घेण्याचे आदेशदेखील संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिले. या बैठकीला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. कपिल आहेर, मनपाचे नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड, डॉ. शैलजा कुटे, डाॅ. अनंत पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि डॉक्टर्स उपस्थित होते.