नांदगांव (संजीव धामणे) : विकेल ते पिकेल या योजनेंतर्गत श्री संत शिरोमणी सावता महाराज योजनेद्वारे शेतकरी व अंतिम उपभोक्ता-वापरकर्ता यांची सांगड घालण्याचा उपक्रम सुरू आहे. नांदगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत उत्पादन शेतापासून ते अंतिम वापरकर्त्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे आहेत.
तालुक्यात मका व कांदा ही मुख्य पिके घेण्यात येतात. मका ३२,००० हेक्टर व कांदा ३,५०० हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येते. स्टार्च बनविणाऱ्या कारखान्यांना व कुक्कुट पालन व्यावसायिकांना खाद्य म्हणून मका आवश्यक असते. तालुक्यात अनेक लहान-मोठे कुक्कुट पालक आहेत. त्या दृष्टीने अनकवाडे येथील १५,००० कोंबड्या असलेल्या उद्योगासाठी काही शेतकरी एकत्र आले असून, शेतातून थेट उद्योगापर्यंत मका पोहोविण्यात येणार आहे.
बाजार समितीच्या दैनंदिन लिलाव प्रक्रियेत कमाल बोली बोलणाऱ्या व्यापाऱ्याने जाहीर केलेला भाव शेतकऱ्याला मिळतो, परंतु त्यातून इतर खर्च अडत इत्यादी कमी होतात. म्हणजे एका क्विंटलमागे १०० ते १५० रुपये बोलीच्या भावातून वजा होतात. या व्यतिरिक्त वाहतुकीचा खर्च एकट्यालाच करावा लागतो. शेतकरी एकत्र येऊन त्यांनी मालाची एकत्र वाहतूक केली, तर तो खर्चही कमी होईल. सदरची वाढीव रक्कम शेतकऱ्याला मिळेल, असा कृषी विभागाचा दावा आहे. मात्र, वापरकर्त्याने मका स्वीकारण्यासाठी ओलावा १२ ते १४ टक्के असणे गरजेचे आहे.
एरवी काही शेतकरी मूलभूत सुविधा नसल्याने मका वाळविण्याच्या फंदात पडत नाहीत. काढला की तसाच बाजारात आणतात. त्याला भाव कमी मिळतो, परंतु प्रमाणित दर्जा असेल, तर बाजारातल्या चढ्या भावापेक्षा अधिक भाव, शेत ते अंतिम वापरकर्ता या साखळीत मिळण्याची शक्यता कागदावर दिसत आहे, पण त्यातला व्यापार शेतकऱ्याच्या समूहाला जमणे गरजेचे आहे.
---------------------
नांदगावचा कांदा थेट कोकण, विदर्भ येथे नेण्याचे कृषी विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. ज्या ठिकाणी जे पिकत नाही, त्या ठिकाणी थेट वापरकर्ता यांच्यापर्यंत उत्पादन पोहोचले, तर त्याचा फायदा उत्पादक शेतकऱ्याला व्हावा, अशी अपेक्षा आहे. त्याच वेळी कोकणचा आंबा नांदगावच्या बाजारात आणण्यासाठी तिथल्या शेतकऱ्यांशी संधान साधले, तर दोन्हीकडच्या शेतकऱ्यांचा फायदा होईल अशी धारणा आहे. त्या दृष्टीने तालुक्यात कृषी विभाग व शेतकरी एकत्र आले आहेत.
----------------