नाशिक : कोराेनासारख्या महामारीच्या प्रादुर्भावात सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य खात्यातील कर्मचाऱ्यांना कोराेनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांचे विमा कवच लागू केले आहे. त्याचप्रमाणे माहिती विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विमा कवच द्यावे, अशी मागणी माहिती व जनसंपर्क कर्मचारी संघटना (गट क) नाशिक विभाग नाशिक संघटनेच्या नाशिक कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी नाशिक विभागाचे उपसंचालक (माहिती) रणजितसिंह राजपूत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी साहाय्यक संचालक मोहिनी राणे, माहिती अधिकारी अर्चना देशमुख, उपसंपादक जयश्री कोल्हे, माहिती व जनसंपर्क कर्मचारी संघटना (गट क) नाशिक विभागाचे अध्यक्ष राजू चौघुले, श्याम माळवे, प्रवीण बावा, किरण डोळस, संजय बोराळकर, पांडुरंग ठाकूर, मनोज अहिरे, प्रमोद जाधव, सुलोचना हिरे, संतु ठमके, शांताराम नरोटे, विलास गोहणे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शासनाने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांबरोबरच जिल्हा प्रशासन, पोलीस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणीपुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले विभागांचे कर्मचारी यांना अशा कर्मचाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी पन्नास लाख रुपयांचे सर्वंकष वैयक्तिक अपघात विमा कवच/ सानुग्रह साहाय्य लागू केले आहे. परंतु माहिती व जनसंपर्क या खात्यातील अधिकारी व कर्मचारी हे राज्यात कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून अन्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच कर्तव्य बजावत आहेत. या खात्यातील अधिकारी व कर्मचारी हे क्षेत्रीय स्तरावर जाऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र तरीही ते विमा कवच तसेच सानुग्रह साहाय्यापासून वंचित आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही विमा कवच लागू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
---
छायाचित्र एनएसके एडिटवर...