नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बसस्थानकाला गेल्या काही दिवसांपासून अवकळा प्राप्त झाली आहे. बसस्थानकाच्या आवारातच मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, तर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, आवारातील कचऱ्याच्या कुंड्या फुल्ल झाल्याने तेथे दुर्गंधीयुक्त कचरा पसरला आहे. त्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना महामारीनंतर काही सुविधांना परवानगी देण्यात आली. यामध्ये ५० टक्के क्षमतेच्या अटीवर बस सुरू झाल्या आहेत. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील, तसेच सिन्नर व संगमनेर या दोन तालुक्यांच्या मध्यवर्ती नांदूरशिंगोटे येथील बसस्थानक आहे. परिसरातील सर्वांत मोठी बाजारपेठ, तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालय येथे असल्याने प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. येथील बसस्थानकात अहमदनगर, पुणे, बीड, सोलापूर, नाशिक, धुळे, सांगली, सातारा आदीसह सिन्नर व संगमनेर आगाराच्या बस, तसेच लांबपल्ल्याच्या बस येत असतात. दररोज शंभरहून अधिक बसची नोंद येथे होत असते. बहुतांश ठिकाणी बस धावू लागल्या आहेत. दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे; परंतु बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बसस्थानक आवारात फलाटासमोर झाडेझुडुपे वाढली आहेत, तसेच बसस्थानकाच्या चोहोबाजूंनी गाजरगवत वाढल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्यामुळे दलदल निर्माण होते. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास दुचाकीस्वारांनाही होतो. आवारातही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. स्वच्छतेचा अभाव आहे. कचऱ्याच्या कुंड्या निकामी झाल्याने कुंड्याभोवतीच कचरा साचून राहिला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने बसस्थानकाच्या आवारात असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे बसस्थानक परिसरातील खड्डे बुजवून कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.
--------------------------
स्वच्छतागृह व शौचालयाची गरज
येथील बसस्थानकामध्ये दररोज शेकडो बस येत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची चढ-उतार होत असते. मात्र, बसस्थानकात पिण्याचे पाणी, शौचालय व स्वच्छतागृह नसल्याने प्रवाशांची अडचण निर्माण होते. बसस्थानकात प्रवाशांना बसण्याची व्यवस्था चांगल्या प्रमाणात नाही. बसस्थानकाचे शेड जुन्या काळातील असल्याने काही ठिकाणी पत्रे तुटलेले आहेत. त्यामुळे विविध समस्यांचा प्रवासी, चालक, वाहक व कर्मचारी यांना त्रास सहन करावा लागत आहे.
---------------------------
फोटो ओळी : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बसस्थानकात ठिकठिकाणी पडलेले खड्डे. (३१ नांदूरशिंगोटे बस)
310721\31nsk_7_31072021_13.jpg
३१ नांदुरशिंगोटे बस