नाशिक : मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेच्या विद्या प्रबोधिनीत पहिल्याच दिवशी स्कूल बसचालकांनी अचानक संप पुकारल्याने विद्यार्थ्यांसह, पालकांची चांगलीच गैरसोय झाली. सकाळी साडेसहा वाजता येणारी बस, साडेसात वाजेपर्यंत आली नसल्याने मिळेल त्या वाहनाने विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे लागले, तर काही विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शाळेला दांडी मारावी लागली. शाळेचा पहिला दिवस असल्याने शहरातील सर्वच शाळांकडून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. विद्या प्रबोधनीमध्येदेखील त्याबाबतचे नियोजन केले होते. मात्र अचानक सकाळी साडेसहा वाजता पगारवाढीच्या कारणास्तव स्कूल बसचालकांनी संप पुकारल्याने शाळा प्रशासनासह पालक तथा विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. गेल्या चार वर्षांपासून स्कूलबसचा ठेका एकनाथ गिते नामक व्यक्तीला दिला जातो. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात याबाबतचा नव्याने करार केला जातो. यावर्षीदेखील मे महिन्यात करार करीत शाळा प्रशासनाने बसचालकांना पाचशे रुपयांची पगारवाढ दिली; परंतु गेल्यावर्षीच्या एक हजार रुपये पगारवाढीच्या तुलनेत यावर्षी केवळ पाचशे रुपयेच पगारवाढ दिल्याच्या कारणास्तव बसचालकांनी संप पुकारला. मात्र याबाबत शाळा प्रशासन पूर्णत: अनभिज्ञ असल्याने पुकारलेला संप बेकायदेशीर असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. तसेच पगारवाढ ही मे महिन्यात दिली असताना जूनमध्ये याबाबत विरोध करणे चुकीचे असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, बसचालकांनी आदल्या दिवशी सर्व आठ स्कूलबसेस धुवून तसेच डिझेल भरून सज्ज ठेवल्या होत्या. त्यामुळे संपाची कल्पना नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
बसचालकांच्या संपामुळे गैरसोय
By admin | Published: June 15, 2015 11:36 PM