कसबे सुकेणे : महाड दुर्घटनेनंतर जाग्या झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि प्रशासनाने गोदावरी नदीवरील सायखेडा पुलावरून अवजड वाहतुकीस कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला छोटी वाहने जातील अशीच कमान बांधण्याचे काम सुरू केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.गोदावरी नदीला आलेला महापूर आणि महाडची दुर्घटना याचा मोठा धसका निफाडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला असून, गेल्या महिनाभरापासून बंद असलेली अवजड वाहतूक आता या पुलावरून कायमस्वरूपी बंद केली जाणार असल्याचे समजते. या पुलाच्या दोन्ही बाजूंनी अवजड वाहने जाऊ नये याकरिता या ठिकाणी कमान टाकली जाणार असून, त्याची उंची आठ फूट असल्याने आठ फुटापेक्षा उंचीची वाहने जाणार नसल्याचा फटका सायखेडा आणि परिसरातील गावातील शेतकऱ्यांना बसणार आहे. पूल गेल्या महिनाभरापूसन बंद असल्याने या गावात बस येणे बंद झाल्याने शिवाय शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. याठिकाणी त्वरित नवा पूल उभारावा नाही तर स्ट्रक्चर आॅडिट करून सध्याचा पूल अवजड वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी अश्पाक शेख, विजय कारे, सुरेश कमानकर, कचेश्वर राजगुरू, उल्हास कदम, राजेंद्र कुटे, सुनील कुटे, सोपान खालकर, नवनाथ पवार, हिरामण शिंदे व नागरिकांनी केली आहे.याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती अश्पाक शेख यांनी दिली.
पुलाअभावी नागरिकांची गैरसोय
By admin | Published: September 09, 2016 12:29 AM