शैलेश कर्पे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : कोरोनाची महामारी आल्याने अगोदरच आठ महिने लांबलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक आणि त्यानंतर सरपंच आरक्षणाचे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेल्याने सिन्नर तालुक्यातील सरपंच व उपसरपंच निवडणूक लांबल्याचे चित्र आहे. त्यामुळे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच व उपसरपंचपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. अनेक ग्रामपंचायतीत अनेकांचे काठावर बहुमत असल्याने सरपंचपदी दावेदारी सांगणाऱ्या सदस्यांची चांगलीच घालमेल वाढली आहे.
सिन्नर तालुक्यात ११४ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी १०० ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. १०० पैकी १० ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. तर ९० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी अटीतटीची निवडणूक पार पडली. ग्रामपंचायत निवडणूक होऊन जवळपास तीन आठवडे झाले असतांना अद्याप सरपंच व उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला नाही. अनेक ग्रामपंचायतीत काठावर बहुमत आल्याने सदस्यांची पळवापळवी होण्याची दाट शक्यता असल्याने अनेकांनी सहलीला जाणे पसंद केले. १८ जानेवारी रोजी निकाल लागल्यानंतर फोडाफोडीच्या राजकारणापासून दूर जाण्यासाठी आपल्या गटाच्या सदस्यांना घेऊन अनेकांनी देवदर्शनाचा मार्ग स्वीकारला. मात्र सहलीला गेलेल्या सदस्यांना बाहेर जाऊन जवळपास २० दिवस झाले आहेत. मात्र सरपंच निवडणूक जाहीर न झाल्याने सहलीला गेल्या सदस्यांचा खर्च वाढल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यातील काही तालुक्यात १२ किंवा १५ तारखेला सरपंच निवडणूक होणार आहे. मात्र सिन्नर तालुक्यातील दहीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाची याचिका उच्च न्यायालयात गेल्याने सिन्नर तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींचा सरपंच निवडणुकीचा कार्यक्रम लांबला आहे. त्यामुळे गावातच असलेल्या व परगावी फिरायला गेलेल्या सदस्यांची घालमेल वाढली आहे.
इन्फो...
‘कौन बनेगा सरपंच’ याचीच चर्चा
तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूक झाल्या आहेत. सरपंच आरक्षण व त्यानंतर महिला आरक्षणाची सोडत झाल्यानंतर आता बहुमताचा जादूई आकडा गाठण्यासाठी सर्वांची रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे या १०० गावांमध्ये ‘कौन बनेगा सरपंच’ याचीच चर्चा सुरू आहे. नवनिर्वाचित सदस्यांना ‘राम..राम.. सरपंच’ म्हणून मधाचे बोट लावले जात आहे. सरपंच होण्याची अनेकांची सुप्त इच्छा या वाक्याने आणखीच उत्तेजीत होत आहे. प्रत्येक चौकात-पारावर सरपंच कोण होईल याचीच चर्चा आहे.
इन्फो...
सहलीला गेलेले सदस्य घराकडे परतू लागले..
सिन्नर तालुक्यात १०० ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. त्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतीत काठावर बहुमत आहे. त्यामुळे अनेकांनी निवडणूक निकाल लागल्यानंतर ‘रिस्क’ नको म्हणून सदस्यांना देवदर्शन व सहलीला रवाना केले. मात्र सरपंच आरक्षण सोडत निघाल्यानंतर अनेक इच्छुकांच्या सरपंच होण्याच्या अपेक्षांवर विरजन पडले. सरपंचपद राखीव झाल्यानंतर अनेकांनी सदस्यांना अर्धवट सहल सोडून घराचा रस्ता धरणे पसंत केले. त्यानंतर महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांची सरपंच होण्याची संधी हुकली. त्यांनीही खर्च टाळून घर गाठले, तर त्यानंतर आता सरपंचपदाची संधी चालून आलेले सदस्य ‘होऊ द्या खर्च.’ म्हणत सहलीवर आहेत.