लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : तोंडावर आलेल्या खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडे शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपासाठी निधी नसल्याने सभासदांसह संचालक हवालदिल झाले आहेत. त्यातच गुरुवारी (दि.११) पुणे येथे जिल्हा बॅँक कार्यकारी संचालकांच्या बैठकीत कोणताही निर्णय न होता, त्याबाबत आढावा शुक्रवारी (दि.१२) सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पुण्याला सहकार आयुक्तांच्या कार्यालयात गुरुवारी दुपारी १२ वाजता बोलाविण्यात आलेली बैठक दुपारी तीन वाजेनंतर सुरू झाली. या बैठकीस सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, तसेच प्रभारी सहकार आयुक्त जोगदंड यांच्यासह नाशिक व जळगाव जिल्हा बॅँकेचे कार्यकारी संचालक व अधिकारी उपस्थित होते. मात्र बैठकीस अधिकाऱ्यांना न बोलवता त्यांच्या कडून फक्त खरिपासाठी लागणारी पीक कर्जाची रक्कम, मागील वर्षातील झालेली पीककर्ज वसुली, बॅँकेचा एनपीए यांसह विविध माहिती घेण्यात आली.शुक्रवारी (दि.१२) मुंबईत दुपारी बारा वाजता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह सहकार सचिव, सहकार आयुक्त, राज्य शिखर बॅँक, नाबार्ड तसेच जिल्हा बॅँकेचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुली अधिकारी यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वाटप करावयाची पीक कर्जाची रक्कम, त्याअनुषंगाने मागील वर्षातील पीककर्ज वसुली यांसह विविध बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे. याच बैठकीत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला पीककर्ज वाटपासाठी आवश्यक असणाऱ्या निधीच्या तरतुदीबाबत तसेच नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या ३४१ कोटींच्या जुन्या चलनातील नोटांबाबत चर्चा व निर्णय होण्याची शक्यता असल्याचे समजते.
पुण्याच्या बैठकीत निराशा; मुंबईच्या बैठकीकडे लक्ष
By admin | Published: May 12, 2017 2:26 AM