मनमाड : मोहेगावच्या (ता. नांदगाव) सरपंच सत्यभामाबाई निवृत्ती काकळीज यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मंगळवारी (दि. २३) मंजूर करण्यात आला. विद्यमान सरपंच मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत सहा सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने कौल दिला.मोहेगावच्या सरपंचपदी सत्यभामाबाई काकळीज यांची १६ आॅगस्ट २०१५ रोजी निवड करण्यात आली होती. सरपंच काकळीज या ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही तसेच मनमानी कारभार करतात या तक्रारीसह अविश्वास ठराव मांडण्यासाठी सहा सदस्यांनी १७ फेब्रुवारी रोजी तहसीलदार नांदगाव यांच्याकडे अर्ज दाखल केला होेता. त्याची दखल घेऊन तहसीलदार अनिल गवांदे यांच्या अध्यक्षतेखाली मोहेगाव ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अॅड. अरुण गायकवाड, सुभाष हारदे, बाळू कलवर, सुरेखा भुसनर, वंदना गरुड, मंगलाबाई साळुंके या सहा सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर करण्याच्या बाजूने मतदान केले, तर सत्यभामा काकळीज, सीताबाई भुसनर, शिवाजी मोरे यांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान केले. तहसीलदार गवांदे यांनी ६ विरुद्ध ३ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे घोषित केले.यावेळी ग्रामसेवक ए. जे. गांगुर्डे, तलाठी संदीप सुरजुसे, बीट हवालदार दगू बारहाते, सुनील पैठणकर हे उपस्थित होते. दरम्यान, लवकरच मोहेगाव सरपंचपद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. (वार्ताहर)
सरपंचाविरोधात अविश्वास ठराव
By admin | Published: February 23, 2016 10:41 PM