नाशिक : गंगापूर धरणातील पाणी आवर्तन निश्चित केल्यानुसार, गेल्या शक्रवारपासून रब्बी पीके, तसेच एकलहरे औषिण्क केंद्रासाठी ७०० ते ८०० क्युसेकने विसर्ग केला जात आहे. पुढील पंधरा दिवस धरणातून पाणी सोडले जाणार आहे.
गंगापूर धरणातील पाण्याचे नुकतेच पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आरक्षण निशिचत करण्यात आले होते. त्यानुसार, रब्बी हंगामातील पिके, तसेच एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पिण्याचे पाणी, सिंचन आणि उद्योगासाठी मागणीनुसार पाणी दिले जाणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे.
गेल्या शुक्रवारी पाटबंधारे विभागाने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. रब्बी हंगामातील पिके, तसेच एकलहरे येथील वीजकेंद्रासाठी हे पाणी सोडण्यात आले. सुमारे ७०० ते ८०० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात असून, पुढील पंधरा दिवस गंगापूर धरणातून आवर्तन सोडले जाणार आहे. धरणातून पाणी सोडले जात असल्याने पाण्याच्या प्रवाहात उतरू नये, असे आवाहन नाशिक पाटंबधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
धरणातून सुरू करण्यात आलेला विसर्ग पुढील काही दिवस सुरूच राहाणार असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नदीकाठावर राहाणाऱ्या मजुरांना गुरुवारी सायंकाळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, काठावर संसार थाटलेल्या राहुट्या काठापासून काही अंतरावर लागल्या आहेत.
--सोमेश्वर धबधबा खळाळला
धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने, सोमेश्वर येथील धबधबा पुन्हा वाहू लागला आहे. शनिवार आणि रविवार सुट्टीचे औचित्य साधून नाशिककर, तसेच नाशिकमध्ये आलेल्या पर्यटकांनी धबधबा पाहण्यासाठी गर्दी केली. कोरोनामुळे बंद असलेले मंदिरेही खुली झाल्याने सोमेश्वर परिसराला पुन्हा एकदा झळाली प्राप्त झाली आहे.