नाशिकरोड : मुक्तिधाम पाठीमागील कोरोनाबाधित परिसरातील फळविक्रेत्याला उपचाराअंती घरी सोडल्यानंतर तो पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात येताच, महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी सायंकाळी पुन्हा त्याला ताब्यात घेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, यामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.मुक्तिधामनजीक राहणारे व मुंबईत कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना महिन्याभरापूर्वी कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच भागात राहणाºया फळविक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याने महापालिकेने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तपासणीअंती त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर उपचार करण्यात आले. सदरचा रुग्ण बरा झाल्याचे समजून रविवारी (दि.१०) सायंकाळी त्याला घरी सोडण्यात आले.सदर रुग्ण घराच्या परिसरात आल्यानंतर त्याच्या नातेवाईक व आजूबाजूच्या रहिवाशांनी टाळ्या वाजवून व फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत केले होते. मात्र सोमवारी दुपारनंतर मनपा वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्वरित त्याच्या घरी जाऊन त्याला पुन्हा ताब्यात घेत दुर्गा उद्यान अग्निशामक दलाच्या केंद्राजवळ असलेल्या केविड कक्षाच्या इमारतीत दाखल केले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराची परिसरात वार्ता पसरताच सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित पॉझिटिव्ह फळविक्रेत्याला जिल्हा रुग्णालयातून घरापर्यंत न सोडता मुक्तिधामजवळ सोडल्याचे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, या रुग्णाला डिस्चार्ज देण्यावरून महापालिका व जिल्हा रुग्णालयात चांगलीच जुंपली असून, सदरचा रुग्ण हा स्लम एरियातील असल्यामुळे त्याला खबरदारी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती मनपाच्या वैद्यकीय अधिकाºयांनी दिली.-----शासनाच्या नवीन नियमानुसार दाखल होणाºया रुग्णास दहा दिवसांनंतर डिस्चार्ज दिला जाणार आहे. पूर्वीप्रमाणे त्यासाठी रुग्णाचा फेरचाचणी अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक नाही किंबहुना अहवाल घेतला जाणार नाही. नाशिकरोडच्या केसबाबत काहीही माहिती माझ्याकडे नाही.- सुरेश जगदाळे,जिल्हा शल्य चिकित्सक
कोरोनाबाधित असूनही डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 10:52 PM