नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, १६ धरणांतील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. पाऊस अद्याप सुरूच असल्याने जिल्ह्यातील १० धरणांतून विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९६ टक्के पाणीसाठा झाला असून, त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मिटला आहे, शिवाय आगामी उन्हाळा सुसह्य होणार आहे. जिल्ह्यात अनेक भागात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जिल्ह्यात अद्यापही पावसाचा धडाका सुरूच असल्याने धरणांतील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यात जिल्ह्यातील आळंदी, पालखेड, तिसगाव, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, नांदूरमधमेश्वर, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, गिरणा, पुनंद आणि माणिकपुंज या धरणांतील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. त्यामुळे दारणा धरणातून ५५० क्यूसेक, भावलीतून २६ क्यूसेक तसेच वालदेवीतून १६, कडवातून ४२४, नांदूरमधमेश्वरमधून ३६३२, भोजापूरमधून ११४, चणकापूरमधून ६०, हरणबारीतून ३३, नागासाक्यातून २१२, तर गिरणातून ९२९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांमध्ये गंगापूर (९७ टक्के), काश्यपी (७५ टक्के), गौतमी गोदावरी (८७ टक्के), करंजवण (९४ टक्के), वाघाड (९९ टक्के), ओझरखेड (९४ टक्के), पुणेगाव (९९ टक्के), मुकणे (८३ टक्के) पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील धरणांसह लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये सद्य:स्थितीत ९६ टक्के पाणीसाठा आहे, तर गतवर्षी हाच साठा ९८ टक्के होता. यंदा १६ प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झालेला आहे, तर मागील वर्षी आजच्या तारखेला २१ धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा होता. यंदा धरणे फुल्ल झाल्याने सिंचनाचा प्रश्न मिटला असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तर अनेक भागातील भूजल पातळीत वाढ झाल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटला आहे.
जिल्ह्यातील दहा धरणांतून विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 10:35 PM
जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, १६ धरणांतील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. पाऊस अद्याप सुरूच असल्याने जिल्ह्यातील १० धरणांतून विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९६ टक्के पाणीसाठा झाला असून, त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मिटला आहे, शिवाय आगामी उन्हाळा सुसह्य होणार आहे.
ठळक मुद्दे१६ धरणे फुल्ल : आगामी उन्हाळा होणार सुसह्य