नांदुरशिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने म्हाळुंगी नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदीवरील भोजापूर धरण शनिवार (दि.15) आँगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. अवघ्या तीन दिवसातच धरणात पन्नास टक्के पाण्याची आवक झाली आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे 539 क्यूसेक पाणी सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्या दोन महिन्यापासून पावसाचे माहेरघर असलेल्या पश्चिम पट्ट्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तालुक्यातील धरणात अल्प प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होता. पंरतु गेल्या गुरुवारपासून जोरदार पाऊस झाल्याने म्हाळुंगी नदीला पूर आला आहे. ठाणगाव जवळील उंबरदरी धरण ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे म्हाळुंगी नदीला पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. नदी प्रवाहित झाल्याने भोजापूर धरणात 10 आँगस्टपासून पाणी येण्यास सुरुवात झाली होती. अवघ्या पाच दिवसात धरणात 70 टक्के पाण्याची आवक झाल्याने 361 दशलक्ष घनफूट क्षमतेचे भोजापूर धरण शनिवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर सुरुच असल्याने म्हांंळुगी नदीद्वारे धरणात दररोज 500 ते 600 क्यूसेकने पाण्याची आवक होत आहे.भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मनेगावसह 16 गावे व कणकोरीसह 5 गावे नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावर नांदूरशिंगोटे व परिसराचे शेती व्यवसाय अवलंबून आहे. धरण भरल्यामुळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे. सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने म्हांंळुगी नदीजवळील बंधाऱ्यात पाणी पोहोचले आहे. दरवर्षी लाभक्षेत्रातील शेतकरी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची वाट पाहत असतात. नेहमी आँगस्ट महिन्याच्या मध्यवर्ती भोजापूर धरण भरण्याचा इतिहास आहे. पंरतु यावर्षी धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी होते तर नांदूरशिंगोटे परिसरात पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात होते. दोन महिन्यांत झालेल्या पावसामुळे लाभ क्षेत्रातील सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. पावसाच्या पाण्याने बंधारे भरल्याने जामनदीचे पाणी पांगरी शिवाराच्या परिसरात पोहचले आहेत. नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र पाण्याच पाणी असल्याने अद्याप धरणाचे पाणी सोडण्याची मागणी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरण पूर्णपणे भरले असून सांडव्यातून पडणारे पाणी.