नाशिक : शहरातील वाहतूक व वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी कायद्याची विविध आयुधे उपसणाऱ्या शहर वाहतूक पोलिसांना आपल्याच कृतीचा विसर पडला असून, परिणामी वाहनचालकांची दिशाभूल होऊन त्यातून गोंधळ व बेशिस्त वाहतुकीला निमंत्रण मिळत आहे. पंडित कॉलनीतील रस्त्यावर एकेरी वाहतुकीचा निर्णय घेऊन त्याची काटेकोर अंमलबजावणीत अपयशी ठरलेल्या पोलीस खात्याने हा रस्ता पुन्हा दुहेरी वाहतुकीसाठी खुला केला, परंतु या रस्त्यावर जागोजागी लावलेले एकेरी वाहतुकीचे फलक तसेच कायम ठेवल्याने वाहनचालक संभ्रमात पडत आहेत. एरव्ही वाहनचालकाला नको ते कायद्याचे कलमाचा धाक दाखवून कारवाईसाठी धजावणाºया पोलीस खात्याला आपल्याच कृतीचा विसर पडल्याने त्यांच्या या प्रमादाबद्दल पोलीस आयुक्त काय शिक्षा करणार? असा प्रश्न वाहनचालक विचारू लागले आहेत.एकेरी मार्ग करण्याचा अनाकलनीय निर्णयटिळकवाडीकडून ठाकरे बंगल्याकडे पंडित कॉलनीमार्गे जाणारा रस्ता वाहतूक पोलीस विभागाने अचानक एकतर्फी वाहतुकीसाठी राखीव केल्याची अधिसूचना आठ महिन्यांपूर्वी काढून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. त्यामुळे ठाकरे बंगल्याकडून शरणपूररोड सिग्नलकडे वाहन नेण्यास बंदी घालण्यात आली होती.शहरातील गंगापूररोड व शरणपूर या दोन प्रमुख रस्त्यांना जोडणाºया पंडित कॉलनीत एकेरी वाहतूक करण्यामागचे कारण समजू शकले नसले तरी, या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असल्याचा शोध वाहतूक विभागाने लावला होता.या मार्गावर हॉस्पिटल्स, कपड्यांची दुकाने, शाळा, बॅँका, कार्यालये असून, एकही इमारत अथवा बंगल्यांना वाहनतळाची सोय नसल्यामुळे रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने रस्त्यावर वाहने उभी करणाºयांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी थेट वाहनचालकांनाच वाहतुकीसाठी रस्ता बंद केला. त्याचा फटका स्थानिक रहिवाशांनाच अधिक बसला.वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमटिळकवाडी ते ठाकरे बंगला हा रस्ता एकेरी करून पोलिसांनी त्यावरील वाहनाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला असला तरी, गंगापूररोडने टिळकवाडीकडे जाऊ पाहणाºया वाहनचालकांना पंडित कॉलनीतील महापालिकेच्या जुन्या कार्यालयाकडून जाण्याची मुभा दिली होती. परंतु या रस्त्यावरही दुतर्फा असलेली दुकाने, बॅँका, रुग्णालये, कार्यालये पाहता या रस्त्यावर वाहतूक कोंडीत भरच पडली. परिणामी एकेरी वाहतुकीचा केलेला प्रयत्न पोलिसांच्या अंगलट आल्याने आता दोन्ही मार्ग येण्या-जाण्यासाठी खुला केल्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला असून पोलिसांचा ताणही कमी झाला आहे. असे असतानाही ठाकरे बंगला ते टिळकवाडी हा रस्ता एकेरी करण्याचे कारण काय याचे उत्तर वाहतूक विभाग देवू शकले नाही. काही ठराविक दुकानदारांच्या सांगण्यावरून पोलिसांनी वाहनचालकांना सहा ते आठ महिने वेठीस धरले काय अशी विचारणाही आता स्थानिक नागरिक करीत आहेत.
वाहनचालकांना शिस्त... वाहतूक पोलीस बेशिस्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:42 AM