सामान्य रुग्णालय व महापालिका रुग्णालयांमध्ये रिक्त पदांसह अन्य सुविधांअभावी सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते राकेश यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने समिती गठित करीत आरोग्यसेवांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश सन २०१६ मध्ये दिले होते; मात्र बराच कालावधी उलटल्यानंतरही सुधारणा होत नसल्याने भामरे यांनी अवमान याचिका दाखल केली होती.रुग्णालयात प्रसूतिसाठी १२ स्त्रीरोग तज्ज्ञ तर १२ भूलतज्ज्ञ अशा २४ खासगी डॉक्टरांची मानधनावर नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. एका दिवसाला दोन या प्रमाणे चार डॉक्टर सेवा देत आहेत. डॉक्टरांची संख्या लक्षात घेत संपूर्ण आठवडाभर डॉक्टर उपलब्ध राहतात. महापालिकेच्या वाडिया व अलीअकबर रुग्णालयातही बंद असलेली प्रसूती सेवा सुरू करण्यात आली आहे. यावर समाधान मानत न्यायालयाने अवमान याचिका निकाली काढली आहे. दरम्यान, याचिकाकर्ते राकेश भामरे यांनी न्यायालयाने केवळ अवमान याचिका निकाली काढली आहे. अद्याप मूळ जनहित याचिका कायम असल्याने त्यावर नियमित सुनावणी सुरूच राहील. समितीने प्रत्येक महिन्याला बैठक घेऊन त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले असल्याचे सांगितले.
आरोग्यसेवेबाबतची अवमान याचिका निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 9:15 PM