नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आता मध्यावर येऊन पोहोचला असून, अवघा एक आठवडा हाती उरल्याने संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना उमेदवारांची दमछाक होताना दिसत आहे. शहरी भागात उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडवला असला तरी, ग्रामीण भागात मात्र निवडणुकीविषयी मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. राजकीय पक्षांकडूनही तालुक्याच्या ठिकाणी प्रचार सभांचे आयोजन केले जात असल्याने खेडोपाडी, वाड्या-वस्त्यांवर अद्यापही कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार याची गंधवार्ताही पोहोचलेली नाही.गेल्या सोमवारी (दि. ७) उमेदवारी अर्ज माघारी प्रक्रियेनंतर खऱ्या अर्थाने उमेदवारांकडून प्रचाराला वेग आला आहे. गेल्या पाच दिवसांपासून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह उमेदवारांकडून मतदारसंघात पिंजून काढला जात आहे. गावोगावी, खेडोपाडी जात उमेदवार मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. शहरी भागात उमेदवारांना मतदारसंघ प्रचारासाठी सोपा असल्याने प्रचाराचा धुराळा उठलेला आहे. मात्र, ग्रामीण भागात खेडोपाडी, वाड्या-वस्त्यांवर जाऊन प्रचार करताना उमेदवारांसह कार्यकर्त्यांची दमछाक होताना दिसून येत आहे. खेडोपाडी अद्यापही कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार याची माहिती बव्हंशी मतदारांपर्यंत जाऊन पोहोचलेली नाही. यंदाचांगल्या पावसामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.त्यामुळेच शेतकरी, शेतमजूर आपल्या कामात गुंतलेले आहेत.
ग्रामीण भागात मतदारांमध्ये निरुत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:52 AM