पदाधिकार्यांच्या गटातच राष्ट्रवादीची पिछाडीनाशिक : दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाल्यानंतर आता पराभवाचे कवित्व सुरू झाले असून, जिल्हा परिषदेच्या सहापैकी तब्बल चार पदाधिकार्यांच्या गटांतूनच राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या फरकाने पिछाडीवर पडल्याने या पदाधिकार्यांनी आता नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी चर्चा दबक्या आवाजात जिल्हा परिषद सदस्यांमध्ये सुरू झाली आहे.नाशिक लोेकसभा मतदारसंघातून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली. त्यांना एकमेव इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून नाममात्र आघाडी मिळाली; मात्र ती इगतपुरी तालुक्यातून नव्हे, तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातून मिळाल्याचे आता उघड झाले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एकूण झालेल्या ७४ हजार २३१ मतदानापैकी भुजबळ यांना ३३ हजार ९८२, तर हेमंत गोडसे यांना १८ हजार ५९० मते मिळाली. उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या अंजनेरी गटासह हरसूल व ठाणापाडा गटातूनच ही आघाडी मिळाली. त्याउलट इगतपुरी तालुक्यातील पाचपैकी अवघ्या शिरसाटे व खेड गटानेच भुजबळ यांना आघाडी दिली. त्याउलट बांधकाम सभापती अलका उदय जाधव यांच्या घोटी गटातून सुमारे ४ ते ५ हजारांनी भुजबळ मागे पडले. एकट्या घोटी शहरातून ते साडेतीन हजाराने मागे आहेत. समाजकल्याण सभापती राजेश नवाळे यांच्या मुसळगाव गटातूनही छगन भुजबळ पिछाडीवरच आहेत. तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातूनही शिक्षण सभापती ज्योती बाळासाहेब माळी यांच्या चांदवड तालुक्यातून राष्ट्रवादीच्या उमेदवार डॉ. भारती पवार या ७० हजार इतक्या प्रचंड मतांनी मागे आहेत. त्यातही वडनेरभैरव गटातूनही डॉ. भारती पवार मागे असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे नांदगाव तालुक्यातूनही डॉ. भारती पवार या ५० हजारांहून अधिक मतांनी मागे आहेत. त्यात महिला व बालकल्याण सभापती सुनीता अहेर यांच्या न्यायडोंगरी गटातूनही डॉ. भारती पवार मोठ्या मताधिक्याने मागे आहेत. जिल्हा परिषद सदस्यांनी आता राज्यात सुरू झालेल्या नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनाम्याच्या मागणीची तळी उचलून धरली असून, जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांनीही पराभव स्वीकारून नैतिकता म्हणून राजीनामे द्यावेत, अशी मागणी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेतही चर्चा नैतिक राजीनाम्याची
By admin | Published: May 19, 2014 11:51 PM