एकलहरे : नाशिक तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात देवळाली विधानसभा मतदारसंघाअंर्तगत एकलहरे गटातील कामकाजाचा आढावा घेण्याबरोबरच, एकलहरे विद्युत प्रकल्पाच्या विस्तारीकरणाबाबत चर्चा करण्यात आली.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे प्रदेश निरीक्षक रवींद्र पवार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, मोहन निंबाळकर, बाळासाहेब म्हस्के, दीपक वाघ, निवृत्ती अरिंगळे, गंगाधर धात्रक, प्रशांत म्हस्के, रामदास पाटील डुकरे, शानू निकम, संतू जगताप, राजू बिल्लाड, सुदाम ताजनपुरे, बाळासाहेब पवळे, लक्ष्मण मंडाले होते. यावेळी देवळाली मतदारसंघांतर्गत एकलहरे गटातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. गटप्रमुख, गणप्रमुख, गावप्रमुख, वॉर्डप्रमुख यांच्या नियुक्त्या करून त्यांच्या कामकाजाची रूपरेषा ठरविण्यात आली.यावेळी राजाराम धनवटे, विष्णुपंत म्हैसधुणे, आसाराम शिंदे यांनी मार्गदर्शन केले. शानू निकम यांनी एकलहरे प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित करून हा प्रकल्प इतरत्र न हलविता आहे त्या जुन्या संचाचे नूतनीकरण करण्याविषयी पक्षाने ठोस भूमिका घ्यावी, असे सांगून त्याबाबतचे निवेदनही देण्यात आले. एकलहरे प्रकल्पाचा मुद्दा वरिष्ठांच्या कानावर घालून वेळ पडल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा प्र्रदेश निरीक्षक रवींद्र पवार यांनी दिला. सूत्रसंचालन रामदास पाटील यांनी, तर आभार आसाराम शिंदे यांनी मानले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात एकलहरे प्रकल्पाबाबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:48 AM