नाशिक : ‘इटलीला तर कोरोनाने खाल्ले, आता तुमचा नंबर आहे. भिलवाडा शहर जगातले दुसरे इटली असेल..’, एका परदेशी पत्रकाराने भिलवाडामध्ये सुरू असलेले कोरोनाचे थैमान पाहिल्यानंतर त्यासंदर्भातली ‘कटू भविष्यवाणी’ वर्तवताना या आशयाचे वृत्त तर माध्यमांमध्ये प्रसिद्ध केलेच, पण तत्पूर्वी या समस्येशी झुंजत असणाऱ्या राजस्थानच्या प्रशासनाला फोन करून त्यांच्यातही भयकंप उडवून दिला. कोरोनाचे संकट गहिरे होतेच, पण त्यामुळे हतबल न होता, राजस्थान प्रशासनाने आव्हान म्हणून त्याकडे पाहिले आणि अतिशय कठोर अंमलबजावणी करताना आपल्या जिल्ह्याला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढले.
संपूर्ण भारतात कुठेही कोरोनाची फारशी लक्षणे दिसत नसताना भिलवाड्यात कोरोनाचे २७ रुग्ण एकापाठोपाठ एक सापडले होते, तिथे आज एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही! प्रशासनाने युद्धपातळीवर काम केले. एकेक घर पिंजून काढताना केवळ आठवडाभरातच जिल्ह्यातील तब्बल ३३ लाख लोकांची पाहणी, तपासणी केली. यात काही जणांची दोन-तीनदाही तपासणी झाली. संपूर्ण भारत लॉकडाऊनच्या आठवडाभरआधीच भिलवाडा जिल्ह्याच्या सर्व सीमा सील झाल्या होत्या.प्रशासनाच्या या कठोर, हिंमतवान प्रयत्नांनाच ‘भिलवाडा मॉडेल’ म्हणून आज गौरवले जातेय. दिल्ली, उत्तर प्रदेशने हे मॉडेल राबवायलाही सुरुवात केली आहे. लवकरच देशभरात त्याची अंमलबजावणी सुरू होईल.या मॉडेलच्या अंमलबजावणीचे दोन दोन प्रमुख शिलेदार होते राजस्थानच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव रोहितकुमार सिंग आणि भिलवाड्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट.रोहितकुमार सिंग सांगतात, अतिशय कठोर आणि अत्यंत झटपट, आक्रमक कार्यवाही हे या मॉडेलचे यश आहे. लोकांशी वागताना आम्ही अतिशय ‘कठोर’ तरीही तितकेचसंवेदनशीलही होतो. आणखी एक आव्हानहोते, ते म्हणजे घरोघर जाणाºया टीमचे मनोबल, हिंमत कायम राखण्याचे. त्यावरही आम्ही भर दिला. सुरुवातीला दोघे दगावले, पण आज जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. सगळे रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, पणतरीही इथल्या कोरोना सैनिकांचे काम मात्र थांबलेले नाही.(सविस्तर माहिती : ‘मंथन’- आतील पानात)आम्ही लोकांची कोणतीच अडचण होऊ दिली नाही, पण कोणालाच कोणतीच सूटही दिली नाही. राजकारण्यांपासून ते पत्रकार आणि समाजसेवकांनाही आम्ही मोकळीक दिली नाही. अनेक अडचणी आल्या, पण त्यातून शिकायलाही मिळाले.- राजेंद्र भट्ट,जिल्हाधिकारी भिलवाडा