भाजपा प्रवेशाच्या अज्ञात फलकाने शहरात चर्चा
By श्याम बागुल | Published: July 31, 2019 01:58 PM2019-07-31T13:58:51+5:302019-07-31T14:00:36+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे अनेक नेते भाजपा, सेनेत पक्षांतर करून प्रवेश करीत असून, त्यामुळे विरोधी पक्षाला दररोज धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. विरोधी पक्षांनी या पक्षांतराला सत्तेचा दुरूपयोग
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : राज्य पातळीवर सध्या सुरू असलेल्या भारतीय जनता पक्षात विरोधकांच्या प्रवेशावरून सोशल माध्यमावर टिका-टिप्पणी केली जात असताना शहरात मध्यरात्रीच्या सुमारास ‘भाजपा प्रवेश देणे आहे’ अशा आशयाचे फलक सर्वत्र लावण्यात आले असून, या फलकावरील मजकूर भाजपाची राजकीय खिल्ली उडविणारा असल्याने अशा प्रकारचे फलक कोणी लावले याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होवू लागली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे अनेक नेते भाजपा, सेनेत पक्षांतर करून प्रवेश करीत असून, त्यामुळे विरोधी पक्षाला दररोज धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. विरोधी पक्षांनी या पक्षांतराला सत्तेचा दुरूपयोग ठरविला असून, त्यावरून आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. सोशल माध्यमावरही दोन्ही बाजुंकडून टिका-टिप्पणी केलेले संदेश व्हायरल केले जात आहेत. अशातच मंगळवारी मध्यरात्री केव्हा तरी शहरातील डोंगरे मैदान, एबीबी सर्कल, उड्डाणपूल, मुंबई नाका आदी भागात ‘भाजपा प्रवेश देणे आहे’ अशा आशयाचे आवाहन करणारे फलक लावण्यात आले आहेत. वरकरणी सदरचे फलक भाजपानेच लावले असावेत असा भास होवून त्याखाली प्रवेशाखाली त्वरीत संपर्क साधा असे नमूद करून टोल फ्री क्रमांकही देण्यात आला आहे. मात्र या मजकुरात भाजपात प्रवेशासाठी नियम व अटी नमूद करून भाजपाची खिल्ली उडविण्यात आल्याने विरोधी पक्षांकडून सदरचा फलक लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यात ‘ईडी व इन्कम टॅक्स नोटीस आलेल्यांना प्राधान्य, भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती व सहकार क्षेत्र बुडविल्याचा अनुभव हवा’ असे नियम व अटी देण्यात आल्या असून, तळटिपेत ‘विचारधारेची कुठलीही अट नाही, आमच्याकडील जागा फुल झाल्यास मित्रशाखेत अॅडजस्ट करता येतील’ असा मजकूर लिहून शिवसेनेलाही त्यात खेचले आहे. त्यामुळे सदरचे फलक विरोधकांनीच लावल्याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र फलक लावणा-या व्यक्ती वा पक्षाने स्वत:ची ओळख दडविली असून, फलकावर मात्र भाजपाचे निवडणूक चिन्ह ‘कमळ’ कायम ठेवण्यात आले आहे.