मालेगाव मध्य : शहरातील विविध प्रश्नांबाबत आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली.शहरातील प्रमुख रस्त्यांना अतिक्रमणाने विळखा घातला आहे. त्यामुळे किदवाई रस्ता, कुसुंबा रस्ता, जुना आग्रा रस्ता आदी प्रमुख रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे. उपकार चित्रपटगृहाला लागून असलेला बंद रस्त्यासंदर्भात जमीन मालकांसोबत चर्चा करून खुला करावा, हा रस्ता खुला झाल्यास कुसुंबा रस्त्यास पर्यायी समांतर रस्ता उपलब्ध होऊन वाहतुकीची समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे. तसेच उड्डाणपुलाची लांबी वाढवून अपना सुपर मार्केटपर्यंत करण्यासाठी शासनस्तरावर निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी बैठकीत आयुक्तांना सांगितले.आयुक्त बोर्डे म्हणाले की, अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासंदर्भात अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन आवश्यक पोलीस बंदोबस्ताबाबत चर्चा करू. बैठकीला उपायुक्त नितीन कापडणीस, शहर अभियंता कैलास बच्छाव, स्थायी समिती सभापती डॉ. खालीद परवेझ, प्रा. रिजवान खान, अल्ताफ शेख, जुल्फेखार अहमद अन्सारी आदी उपस्थित होते.
मालेगावच्या प्रश्नांबाबत आयुक्त-आमदारांची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:56 AM