विजवितरण कंपणीचे खांब धोकेदायक
नाशिक : शहरातील काही भागांत वीज वाहिन्यांचे खांब वाकल्याने धोकादायक बनले आहेत. खांब वाकल्यामुळे त्यावरील ताराही लोंबकळू लागल्या आहेत. राज्य वीज वितरण कंपनीने याबाबत उपाययोजना करून वाकलेल्या खांब काढून, त्या ठिकाणी नवीन खांब बसविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
गॅस सिलिंडर महागल्याने नाराजी
नाशिक : केंद्र सरकारणे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांना पुन्हा दरवाढीचा धक्का बसल्याने अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याची मागणी होत आहे.
माहिती देताना खबरदारीचे आवाहन
नाशिक : शहरातील अनेक गर्दीच्या ठिकाणी विविध क्रेडिट कार्डच्या कंपण्यांचे एजंट उभे राहून ग्राहकांना आकर्षित करीत असल्याचे दिसून येते. अगदी जुजबी माहितीवर आणि कमी वेळेत ग्राहकांना विविध कंपण्यांचे कार्ड उपलब्ध होत असले, तरी ग्राहकांनी आपली माहिती देताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन बँकांमार्फत केले जात आहे.
तरुणांना आकर्षित करण्याचे प्रयत्न
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांसाठी अनेकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. प्रभागातील अधिकाधिक तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी इच्छुकांकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहेत. प्रभागात मागील पाच वर्षांत तयार झालेल्या नवीन परिसरातील नागरिकांशी संपर्क वाढविण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे.