धनंजय मुंडेंच्या जागी मंत्रिपद देण्याची चर्चा; परदेशातून येताच भुजबळ म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 19:47 IST2025-01-02T19:46:46+5:302025-01-02T19:47:24+5:30
मंत्रिपदाच्या चर्चांवर छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे.

धनंजय मुंडेंच्या जागी मंत्रिपद देण्याची चर्चा; परदेशातून येताच भुजबळ म्हणाले...
NCP Chhagan Bhujbal: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार छगन भुजबळ यांना यंदा मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केल्यानंतर छगन भुजबळ हे काही दिवसांसाठी कुटुंबासोबत परदेशात निघून गेले होते. परदेशातून नाशिकमध्ये परतल्यानंतर आज छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि मंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर आपली भूमिका मांडली आहे.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी छगन भुजबळ यांना संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले की, "वडेट्टीवार काय म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात, यावर मी काय चर्चा करू शकतो? आणि हे सुद्धा डोक्यातून काढून टाका की, मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून दुसऱ्या कोणाला तरी मंत्रिपदावरून काढा आणि त्यांच्या जागी मला मंत्रिपद द्या, हे माझ्या डोक्यात येणं अशक्य आहे. त्यामुळे आता बघू पुढे काय होतं ते," अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली.
"परदेशात गेल्यानंतर मला कोणाचेही फोन आलेले नाहीत. आले तरी मी ते तुम्हाला सांगू शकणार नाही. पण मी थोडा वेळ राजकारणातून डोकं बाजूला काढलं होतं. १९६७ सालापासून राजकारणात काम करत आहे. त्यामुळे थोड्या वेळ आराम करणंही ठीक आहे," असंही भुजबळ यावेळी म्हणाले.
दरम्यान, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची उद्या जयंती आहे. या औचित्यावर चाकण इथं सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा होणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह छगन भुजबळ हे एका मंचावर येणार आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर हे दोन्ही नेते पुन्हा एकदा एका मंचावर येणार असल्याने तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.