लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : येथील बहुचर्चित उड्डाणपुलाखालून केवळ एकेरी वाहतूक करण्यात आली असली तरी समांतर रस्त्यावरून दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असल्याने मुळात या चौकात समांतर ररस्त्यावरील वाहतूकच एकेरी करण्याची नवी चर्चा आता सुरू झाली आहे. असे असले तरी पोलीस यंत्रणेकडून वाहतूक कोंडीचा प्रश्नच नसल्याचे वारंवार सांगितले जात आहे. इंदिरानगर येथील बोगद्याखालून होणाऱ्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येथील वाहतूक व्यवस्थेबाबत अनेकदा प्रयोग करण्यात आलेले आहे. आता शनिमंदिराकडून गोविंदनगरकडे जाण्यासाठीचा मार्ग खुला करण्यात आला तर गोविंदनगरकडून शनिमंदिर, जॉगिंग ट्रॅककडे येण्यासाठी छान समोरील उड्डाणपुलाखालून जागा करून देण्यात आलेली आहे. असे असले तरी वाहतूक कोंडीचा प्रश्न अजूनही मिटलेला नाही. उड्डाणपुलाखालून जाणारी वाहने पलीकडे भुजबळ फार्मकडून समांतर रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे अडकून पडतात. या ठिकाणी वाहतूक पोलिसालाच वाहतूक नियंत्रित करावी लागते. येथील एका अभियंत्याने वाहतूक व्यवस्थेबाबतचा नवा फार्म्युला तयार केला आहे. समांतर रस्त्याची रुंदी वाढवून बोगद्याखालील वाहतूक ही समांतर रस्त्यानेच केल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकेल, असे संकल्पचित्र त्यांनी तयार केले आहे.सध्या ज्या पद्धतीने वाहतूक नियोजन करण्यात आले आहे त्यामध्ये थोडी सुधारणा केल्यास कोंडीचा मोठा प्रश्न सुटू शकेल. बोगद्याचा वापर पूर्ण क्षमतेने करताना सध्या ज्या गोविंदनगर कडून येणारी वाहतूक ज्या समांतर रस्त्यावर वळविली आहे त्यापेक्षा ती पहिल्या समांतर रस्तवरून पुढच्या वळणावरून शनिमंदिराकडे येईल, अशी व्यवस्था करणे अपेक्षित आहे. तर मुंबई नाक्याकडून येणाऱ्या वाहतुकीसाठी दुसरा समांतर रस्ता राखून ठेवावा. भुजबळ फार्मकडून येणारी वाहतूक ही समांतर रस्त्याने पुढे न नेता गोविंदनगर रस्त्याला वळसा घालून पहिल्या समांतर रस्त्यावर जाईल, अशी व्यवस्था केल्यास वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होऊ शकेल, असा तरुणाने नकाशा बनविण्यात आला आहे.
समांतर रस्तेच एकेरी करण्याची चर्चा
By admin | Published: May 18, 2017 1:13 AM