नाशिक : नांदगाव, येवला आणि चांदवड तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा मुद्दाही चांगलाच गाजला. दीपक शिरसाठ यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यास आत्माराम कुंभार्डे यांनीदेखील दुजोरा देत शिक्षक नियुक्तीबाबत जिल्हा परिषदेकडून चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप केला. पदवीधर शिक्षक म्हणून थेट नियुक्ती देता येऊ शकते, असा शासनाचा आदेश असल्याचे त्यांनीच शिक्षण विभागाला सांगून ‘शिक्षित’ केले. जिल्ह्यातील नांदगाव, येवला आणि चांदवड या तीनही तालुक्यात शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागा समुदेशनातून भरता येणे शक्य नसेल तर पदवीधर शिक्षक नियुक्ती करण्याची मागणी शिरसाठ आणि कुंभार्डे यांनी केली.वीजबिल भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसेचांदवड तालुक्यातील काळवट वस्तीवरील शाळेचे वीजबिल भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दहा रुपये गोळा करण्यात आल्याचे सदस्य कविता धाकराव यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. विद्यार्थ्यांकडून वीजबिलाचे पैसे घ्यावे लागतात, असे येथील शिक्षक सांगत आहेत त्यामुळे धाकराव यांनी हा मुद्दा सभागृहापुढे मांडला. असे कोणतेही शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतले जात असेल तर त्याची चौकशी करून संंबंधित शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी दिले. कविता धाकराव यांनी वडाळीभोई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकारी उपस्थित राहत नसल्याने अनेकदा रुग्णांवर वेळीच उपचार होत नसल्याचा मुद्दाही सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.