नाशिक : लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेले मजूर हे पायपीट करीत आणि जमेल त्या पद्धतीने आपल्या गावाकडे जात आहेत. याविषयी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी अशा पद्धतीचे स्थलांतर हे सरकारला अशोभनीय असल्याचे मत व्यक्त केले आहे. आपण कोणावर टीका करत नाही. मात्र, त्यांच्यासाठी पुरेशा सुविधा देणे आवश्यक असल्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. लॉकडाउन हाच कोरोनाच्या विरोधातील अंतिम उपाय नाही. कारण त्यामुळे आता मुंबईसह अन्यत्र उद्योग धंदे सुरू होणारच नाही या समजातून ते निघाले आहेत, असेही मत भुजबळ यांनी व्यक्त केले.गुरुवारी (दि.७) प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. मुळातच पंतप्रधानांनी एका रात्रीत लॉकडाउन जाहीर करणे चुकीचे होते. किमान दोन ते तीन दिवस वेळ दिला असता तर कामगारांना आपल्या गावी जाता आले असते आणि उद्योग व्यावसायिकांनादेखील आश्वस्त करता आले असते, परंतु एकाएकी हा निर्णय जाहीर करण्यात आला, अशी केंद्र सरकारवर त्यांनी टीका केली. राज्यातील कामगार आणि मजूर हवालदिल झाले आहेत. त्यांना आता घराची ओढ लागली असल्याने ते घराकडे निघाले आहेत. त्यांना राज्यात किंवा परराज्यात जाण्यासाठी सोय करून दिली असती तर योग्य ठरले असते. आज बस किंवा अन्य साधने नसल्याने ते पायी जाताना अनेक गावांत थांबतात, भोजन करून पुन्हा निघतात, त्यामुळे संसर्ग वाढू शकत नाही काय असा प्रश्न करीत भुजबळ यांनी आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयाला वाचा फोडली होती, असेही सांगितले.राज्यातून अशाप्रकारे जाणारे मजूर हे भलेही या राज्याचे नागरिक नसले तरी देशाचे तर नागरिक आहेत ना, मग त्यांची जबाबदारी कशी टाळता येईल, असा प्रश्न त्यांनी केला. वारंवार बदलणाऱ्या आदेशांमुळे गोंधळाचे वातावरण आहे, असे सांगतानाच त्यांनी कोरोनाच्या विरोधात सर्वांनी एकत्रित लढायचे आहे, असेही सांगितले.-------------शासकीय अधिकाऱ्यांतील विसंवादशासकीय अधिका-यांमध्ये असलेल्या विसंवादावर टीका करताना भुजबळ यांनी जिल्हाधिकारी दुकाने उघडी करण्यास सांगतात आणि पोलीस दुकाने बंद करायला सांगतात हे बरोबर नाही. वेळेची मर्यादा दुकानांना देणे म्हणजे गर्दी करण्यास निमंत्रण देण्यासारखे आहे. ही संचारबंदी आजाराच्या विरोधात आहे, जातीय दंगलीसाठी नाही असे सांगून त्यांनी प्रशासकीय घोळाबद्दल नाराजी व्यक्त केली.
मजुरांचे विदारक पद्धतीने स्थलांतर सरकारला अशोभनीय : भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 10:03 PM