नाशिक - सातपूर-अंबड लिंकरोडवरील हटवण्यात आलेल्या भंगार बाजार व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यासह परिसरात मिनी कमर्शिल झोन लागू करण्यासाठी नाशिक शहर अल्पसंख्यांक कॉँग्रेस आणि युवक कॉँग्रेसच्यावतीने भंगार बाजार व्यावसायिकांचा महापालिकेवर मोर्चा नेण्यात आला. राजीव गांधी भवनसमोर झालेल्या जनआक्रोश आंदोलनात व्यावसायिकांनी महापालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईचा निषेध करत घोषणाबाजी केली.बी. डी. भालेकर हायस्कूलपासून भंगार बाजार व्यावसायिकांच्या मोर्चाला सुरुवात झाली. कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, अल्पसंख्यांक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शेख हनीफ बशीर आणि युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहूल दिवे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा महापालिकेवर नेण्यात आला. मोर्चात महापालिका प्रशासनाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. याशिवाय, व्यावसायिकांच्या हातात ‘भिक नको हक्क हवा, अन्याय नको न्याय हवा’, ‘मिनी कमर्शिअल झोन झालाच पाहिजे’, ‘पर्यायी जागा मिळालीच पाहिजे’ असे फलकही लक्ष वेधून घेत होते. राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी, उद्धवस्त झालेल्या व्यवसायाच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागा मिळावी, सातपूर-अंबड लिंकरोड येथे मिनी कमर्शिअल झोन लागू करावा, लिंकरोडवर व्यापाऱ्याना स्वत:च्या मालकी हक्काच्या जागेवर मिनी स्क्रॅप मार्केटला मान्यता द्यावी आणि मालकी हक्काच्या जागेवर व्यवसाय करण्यासाठी शेड उभारण्यास परवानगी द्यावी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यावेळी भंगार बाजार व्यावसायिकांनी प्रशासनाने केलेल्या कारवाईचा निषेधही केला. या आंदोलनात नगरसेवक वत्सला खैरे, आशा तडवी तसेच कॉँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आकाश छाजेड यांचेसह भंगार बाजार व्यावसायिक सहभागी झाले होते.
सातपूर-अंबड लिंकरोडवरील हटवण्यात आलेल्या भंगार बाजार व्यावसायिकांचा पर्यायी जागांसाठी आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 2:44 PM
महापालिकेवर मोर्चा : मिनी कमर्शिअल झोनची मागणी
ठळक मुद्देबी. डी. भालेकर हायस्कूलपासून भंगार बाजार व्यावसायिकांच्या मोर्चाला सुरुवात मालकी हक्काच्या जागेवर व्यवसाय करण्यासाठी शेड उभारण्यास परवानगी द्यावी