येवला : अंदरसूल बसस्थानकात सर्व बस न थांबल्यास विद्यार्थ्यांनी जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.येथून येवल्याला सुमारे ६०० विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी संख्या असतानाही अंदरसूल बसस्थानकावर बस न थांबता पुढे जाऊन थांबते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ती बस धावत पकडणे शक्य होत नाही. वैजापूर व येवला आगाराच्या बसच्या बाबतीत या स्वरूपाच्या तक्रारी आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी अनेकवेळा ही अडचण आगार व्यवस्थापनाकडे सांगितली; परंतु याची दखल घेण्यात आली नाही. दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी वैजापूर डेपोची औरंगाबाद-नाशिक बस अंदरसूल बसस्थानकावर न थांबता स्थानकापासून २०० मी. अंतरावर थांबली. विद्यार्थ्यांची परीक्षेची वेळ असल्याने ते धावत बस पकडण्यासाठी गेले. या बसमध्ये कु. मयुरी वल्टे व इतर मुली चढत असताना चालकाने जोरात बस पुढे नेल्याने ती मुलगी खाली पडली. डोक्याला जबर मार लागल्याने ती रुग्णालयात नेत असताना मरण पावली. या घटनेमुळे सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी संतप्त झाले आहेत. ही बाब गांभीर्याने घेऊन अशा प्रकारचे आडमुठे धोरण बंद करावे व विद्यार्थ्यांशी आपुलकीने आचरण करावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शिवसेना शहरप्रमुख राजकुमार लोणारी, साजीद शेख, धीरज परदेशी, आशिष अनकाईकर यांच्यासह ५० कार्यकर्त्यांनी दिला. (वार्ताहर)