नांदगाव : आगारातून सुटणाऱ्या बसेस वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष वाढत आहे. बस रद्द होणे, उशिराने सुटणे यामुळे बसचा प्रवासीवर्ग खासगी वाहतुकीकडे वळत असल्याचा आर्थिक फटका परिवहन महामंडळाला बसत आहे. त्या स्पर्धेला तोंड देताना, दिवसेंदिवस तोट्याकडे प्रवास सुरू असल्याने नांदगाव आगार बंद करण्याची पत्रं येथील व्यवस्थापनाला येणे ही नित्याचीच बाब झाली आहे. लांब पल्ल्याच्या नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी त्यामुळे दूरच राहिली. वरील सर्व दुरवस्थांचे मूळ व्यवस्थापनाकडे असले तरी येथे असलेली कर्मचारीसंख्यासुद्धा यास कारणीभूत आहे. ११२ वाहकांची गरज असताना ९७च वाहक आहेत. लिपिकांची संख्या कमी असल्याने यातले सात वाहक लिपिकाची कामे करतात. तीन वरिष्ठ लिपिकांपैकी एकही लिपिक येथे नाही. ११ कनिष्ठ लिपिक हवे असताना येथे केवळ सहाच लिपिक आहेत. वाहतूक नियंत्रकाच्या पाच जागा खाली आहेत. फक्त दोनच नियंत्रक वाहतुकीचे नियोजन करतात. तीनपैकी एकच पर्यवेक्षक कार्यरत आहे. कार्यशाळेत ५१ कर्मचारी आवश्यक असताना फक्त ४१ कर्मचारी आहेत. त्यातले दोन लिपिकाचे काम करतात. रस्त्यावर कायम नादुरु स्त होणाऱ्या व जुन्या बसेसवर अवलंबून असलेल्या नांदगाव आगाराला कोणी वालीच नाही, अशी स्थिती आहे. मध्यंतरी स्पेअर पार्ट्सचा तुटवडा होता. अलीकडे थोडी सुधारणा झाली असली तरी मनुष्यबळ कमी. त्याची भरपाई कशी करणार हा प्रश्न आहे. वरिष्ठ स्तरावर नवीन भरती सुरू झाली आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक गुलाब बच्छाव यांनी दिली. ते व्हायचे तेव्हा होईल प्रवाशांनी तोपर्यंत बसथांब्यावर थांबून राहायचे का, असा सवाल प्रवासी संघटनेचे विलास साळुंके यांनी केला आहे. (वार्ताहर)
बसेस वेळेवर धावत नसल्याने असंतोष
By admin | Published: April 07, 2017 11:28 PM