देवळा : गेल्या आठ महिन्यांपासून देवळा ग्रामपालिका बरखास्त होऊन नवीन देवळा नगरपंचायतीची स्थापना होऊन प्रशासकपदी तहसीलदार देवळा यांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु देवळा नगरपंचायतीचा कारभार अनागोंदी झाला आहे. त्यात कर्मचाऱ्याचे वेतन असो, रस्त्यावरचे पथदीप असो अशा अनेक बाबींसाठी निधीची उपलब्धता न झाल्याने नागरिकांसह कर्मचारीदेखील त्रासले आहेत.महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून देवळा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना राबवून घेण्याची आयती संधीच मिळाल्याने नगरपंचायतीच्या कामाव्यतिरिक्त जनगणनेची कामे त्यांच्यावर लादण्यात आली. नगरपंचायतीचे कार्यालयीन कामकाज पाहून हे काम करावे लागत असल्यानेच जनगणनेच्या कामात दिरंगाई होते. याबाबत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असून, त्याचा निषेध म्हणून गुरुवारी संविधानदिनी नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर काम बंद आंदोलन केले.येत्या ३० नोव्हेंबर रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक कारभार हाती घेणार असून, किमान त्यांनी तरी या बाबी लक्षात घेऊन न्याय द्यावा, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. काम बंद आंदोलनात सुधाकर अहेर, शरद पाटील, नाना अहेर, शशिकांत मेतकर, दत्तात्रय बच्छाव, हिरामण अहेर, चंद्रकांत चंदन, दीपक गोयल, सतीश साळुंके, राजेंद्र शिलावत, भाऊसाहेब सावळे, शांताराम घुले, गुलाब शिरसाठ, धनूबाई गोयल, हौसाबाई साळुंके, अनिता साळुंके, विमलबाई देवरे, सुशाबाई घोडेस्वार, संगीता साळुंके, जागृती गोयल आदि नगरपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
नगरपंचायतीच्या कारभारावर नाराजी
By admin | Published: November 26, 2015 10:05 PM