नाशिक : राग बिभास, ललत आणि अहिरभैरवमध्ये बांधलेल्या त्रिदेव स्तुतीने ‘रंग त्रिताल’ या संकल्पनेवर आधारित दिवाळी पहाट उत्साहात साजरी करण्यात आली. बुधवारी (दि. २६) पहाटे सावरकरनगर येथील रचना ट्रस्ट येथे कीर्ती कलामंदिर, अभिजात अकादमी आणि कलानंद यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अदिती पानसे, सुमुखी अथणी आणि प्रेषित पंडित यांनी एकत्रितपणे सूर्यदेवता, गणपती आणि लक्ष्मी या देवतांना वंदन करून उत्कृष्ट नृत्य सादरीकरणास सुरुवात केली. कार्यक्रमात अभिजात अकादमीच्या विद्या देशपांडे यांनी विलंबित लयीतील थाट सादर केले, तसेच सुमुखी अथणी यांनी पारंपरिक आमद सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत असताना आदिती पानसे, कीर्ती कलामंदिराच्या ज्येष्ठ विद्यार्थिनींनी परणजुडी आमद पेश केला. ज्येष्ठ नृत्यांगना रेखा नाडगौडा यांनी केलेल्या ‘धतीट धतीट’ हा विलंबित लयीतील पदन्यास सादर केला. यानंतर तिन्ही संस्थांच्या विद्यार्थिनींनी तोडे, चक्रकार तोडे, प्रिमलू, कवित्त या पारंपरिक बंदिशी सादर केल्या. यानंतर विद्या देशपांडे यांनी भिन्न षडज् रागातील ‘याद पिया की आये’ या ठुमरीचे सादरीकरण केले. नृत्यांगना रेखा नाडगौडा यांनी बिंदू गोस्वामी यांनी रचलेले धानी रागातील ‘प्रभू को नियम बदलते देखा’ या भजनावर आधारित नृत्य पेश करत उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सांगता भैरवीच्या सुरावटीवर द्रुत लयीत ‘तकीट तकीट धिन’ या तत्काराने झाली. यावेळी नितीन पवार आणि सुजित काळे (तबला), सुभाष दसककर आणि ईश्वरी दसककर (संवादिनी) आणि अश्विनी भार्गवे (गायन) यांनी साथसंगत केली. ‘रंग त्रिताल’ या कार्यक्रमाचे यंदाचे आठवे वर्ष होते. दरवर्षी वसूबारसच्या दिवशी हा नृत्याविष्कार सादर केला जातो. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रंग त्रितालात उगवली दिवाळी पहाट नृत्यमयी अनुभव : अभिजात नृत्यकलेच्या सादरीकरणाने रसिक झाले मंत्रमुग्ध
By admin | Published: October 26, 2016 11:59 PM