नाशिक : महापालिकेने काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मिळकत सर्वेक्षणात शहरातील २ लाख ६९ हजार मिळकतींत अतिक्रमण झाल्याची धक्कादायक माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उच्च न्यायालयात सादर केल्याच्या चर्चेने सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. अर्थात, यासंदर्भात महापालिकेतील सर्व विभाग अत्यंत अनभिज्ञ आहेत. तथापि, न्यायालयाने आता कारवाईचे आदेश दिले तर शहर उद्ध्वस्त होईल, अशी भीती विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या वतीने ठराविक कालावधीनंतर शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण केले जाते. सुरुवातीला हे काम महापालिकेचे कर्मचारी करीत मात्र नंतर शहर वाढल्याने खासगी एजन्सीकडून केले जाते तसेच उपग्रहाद्वारेदेखील सर्वेक्षण केले जाते. महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. प्रवीण गेडाम असताना सर्वेक्षणाचे हे काम सुरू झाले होते. दरम्यान, संथ असलेल्या या कामाला गती मिळाली असली तरी त्याचे निकष जे अद्याप अधिकृतरीत्या जाहीर नाहीत ते धक्कादायक असून २ लाख ६९ हजार मिळकती आत्तापर्यंत बेकायदेशीर ठरविण्यात आल्या आहेत. नाशिक शहरातील एकूण मिळकतींची संख्या ४ लाख १७ हजार असून त्यातील साडेतीन लाख मिळकतींचे सर्र्वेक्षण झाले आहे. त्यातच इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर इमारती किंवा बेकायदेशीर बांधकाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यात ही माहिती देण्यात आल्याचे सध्या सोशल मीडियावर फिरते आहे. तत्पूर्वी ही माहिती आयुक्त मुंढे यांनी स्थायी समितीच्या चर्चेच्या वेळीदेखील सादर केली होती.विधी विभागही अनभिज्ञतुकाराम मुंढे यांनी बेकायदेशीर बांधकामांबाबत उच्च न्यायालयात माहिती दिल्याने न्यायालयाने त्यांचे कौतुक केले अशाप्रकारचे वृत्त सध्या सोशल मीडियावर पसरविले जात असले तरी महापालिकेच्या विधी विभागाकडे यासंदर्भात चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची माहिती नाही. मग हा काय प्रकार आहे असा प्रश्न बोरस्ते यांनी केला आहे.
निम्मे नाशिक अतिक्रमित ठरविल्याने अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 1:42 AM