नाशिक : जुन्या नाशकातील तांबट गल्लीतील काळे वाड्याची भिंत कोसळून दोन तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्याच्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नसून, दुर्घटनाग्रस्तांना मदतीसाठी शासनाने तयार केलेले कायदेच मदत देण्याकामी अडथळे ठरल्यामुळे महिना उलटूनही दोन्ही कुटुंबांना आर्थिक मदत मिळालेली नाही.जुन्या नाशकातील तांबट आळीतील दुमजली काळे वाड्याच्या मागील भाग आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोसळल्याने माती, विटांच्या ढिगाऱ्याखाली दबून समर्थ काळे, करण घोडके हे दोघे तरुण ठार झाले होते, तर तिघे जण गंभीर जखमी झाले होते.जुन्या नाशकात मोठ्या प्रमाणावर जुने वाडे असून, अनेक वाड्यांमध्ये मालक व भाडेकरू असे वाद असल्यामुळे अशा वाड्यांची देखभाल, दुरुस्ती करण्यातही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातूनच काळे वाड्याची दुर्घटना घडली असली तरी, घरातील कर्ते व तरुण दोघा मुलांचा हकनाक बळी गेल्याच्या घटनेची दखल घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मृतांच्या नातेवाइकांना व जखमींना शासकीय आर्थिक मदतीची घोषणा केली होती.नैसर्गिक आपत्ती कोसळल्यास संबंधितांना राष्टÑीय नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मदत देण्याची तरतूद आहे; परंतु काळे वाडा दुर्घटनेत नैसर्गिक आपत्तीचे निकष लागू पडत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. साधारणत: ६५ मिलीमीटर पाऊस होऊन घरांची पडझड झाल्यास, जीवित व वित्तहानी झाल्यास मदत देय आहे; मात्र काळे वाडा पडला त्या दिवशी नाशकात फक्त १ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय सदरचा वाडा धोकादायक होता किंवा नाही याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही.काळेवाडा धोकादायक अवस्थेत असेल व तो खाली करण्याचा अथवा पाडून टाकण्याच्या नोटिसा महापालिकेने बजावल्या असतील तर त्यासाठी शासनाच्या १९ जुलै रोजीच्या आदेशानुसार किमान चार लाख रुपये मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देय आहे; परंतु काळेवाड्याला महापालिकेने धोकादायक म्हणून नोटीस बजावली होती किंवा नाही याची माहिती अद्यापही मनपाने जिल्हा प्रशासनाला दिलेली नाही.
दुर्घटनाग्रस्त कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 1:27 AM
जुन्या नाशकातील तांबट गल्लीतील काळे वाड्याची भिंत कोसळून दोन तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्याच्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नसून, दुर्घटनाग्रस्तांना मदतीसाठी शासनाने तयार केलेले कायदेच मदत देण्याकामी अडथळे ठरल्यामुळे महिना उलटूनही दोन्ही कुटुंबांना आर्थिक मदत मिळालेली नाही.
ठळक मुद्देमहिना उलटला : आर्थिक मदतीबाबत कायदेशीर पेच