सिन्नर : दहावी, बारावीच्या परीक्षा आणि त्यांचे निकाल या कामांना प्राधान्य दिल्यामुळे शालार्थ आयडीचे काम प्रलंबित राहिले. विशेष म्हणजे शिक्षण विभागाकडे मनुष्यबळ तोकडे असून ते वाढून दिल्यास शालार्थ आयडीच्या फाईलला गती येईल. पारदर्शी पद्धतीने शालार्थ आयडीचे काम मार्गी लावू, त्यासाठी शिक्षकांना कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची गरज नसल्याचे पुणे येथील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.प्रलंबित आयडीच्या फाईल मार्गी लागाव्यात यासाठी पुणे येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांच्या सोबत कनिष्ठ महाविद्यालयीन शालार्थ ग्रस्त शिक्षकांची बैठक पार पडली. जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार येथून ६० प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. ३० जून पर्यंत सर्वांना शालार्थ आयडी मिळावा, अशी भूमिका यावेळी शिक्षक पदाधिकाऱ्यांनी मांडली. फेब्रुवारी महिन्यात पुणे येथून नाशिकला आलेल्या फाईल धूळखात पडून आहे. शिक्षण विभागाचा आपल्यास यंत्रणेवर विश्वास नसल्यानेच या फाईल प्रलंबित असल्याचा आरोप शिक्षकांनी केला. तसेच काही शिक्षकांनी शासनाच्या शिक्षण विभागाचा आपल्याच यंत्रणावर विश्वास नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
अपुऱ्या मनुष्यबळाअभावी शालार्थ आयडीचे काम रखडल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 5:41 PM