नाशिक-राज्यातील प्रदुषणकारी शहरात नाशिकचा समावेश झाल्यानंतर तसेच जल प्रदुषणाबाबत पर्यावरणवादी जागृत असल्याने गेल्या काही वर्षात महापालिकेने अनेक उपायोना राबवल्या मात्र शहरातील प्रदुषण कायम असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे.
नाशिक शहरातील जल, वायु आणि ध्वनी प्रदुषणाची पातळीचे दरवर्षी मापन केले जाते आणि जुलै महिन्याच्या आत यासंदर्भातील अहवाल महासभेवर संमत करण्यासाठी मांडला जातो. यंदा लॉकडाऊनमुळे महासभाच रखडल्या नंतर त्या ऑनलाईन सुरू झाल्या. या दरम्यान आता शहरातील प्रदुषणाचा अहवाल देखील महापालिकेला मिळाला आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या सीबीएस, पंचवटी कारंजा,व्दारका सर्कल, पाथर्डी फाटा येथे हवेची गुणवत्ता तपासण्यात येते. येथे पी.एम. म्हणजेच पार्टीक्युलेट मॅटर १० चे प्रमाण मानकापेक्षा (शंभर मायक्रो ग्रॅम प्रती घन मीटर) जास्त आढळले. तर त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नल व मुंबई नाका येथे पीएम १० चे प्रमाण कमाल विहीत मानकांपेक्षा कमी आढळले.व्दारका सर्कल येथे पी.एम. (पार्टीक्युलेट मॅटर) २५ चे प्रमाण विहीत कमाल मानकांपेक्षा (६० मायक्रो ग्रॅम प्रती घनमीटर) जास्त आढळले तर त्र्यंबकरोड वरील आयटीआय सिग्नल, सीबीएस, पंचवटी कारंजा, मुंबई नाका, पाथर्डी फाटा व बिटको चौक येथे पीएम २५ चे प्रमाण कमाल विहीत मानकापेक्षा कमी आढळले. त्र्यंबकरोड, आयटीआय सिग्नल, व्दारका सर्कल व बिटको चौक येथे सल्फर डाय ऑक्साईडचे प्रमाण कमाल विहीत मानकापेक्षा (८० मायक्रोे ग्रॅम प्रति घनमीटर) जास्त आढळले आहे. तर सीबीएस, पंचवटी कारंजा, मुंबई नाका आणि पाथर्डी फाटा येथे सल्फर डाय ऑक्साईडचे प्रमाण कमाल विहीत मानकापेक्षा कमी आढळले आहे.
या सर्वच ठिकाणी नायट्रोजन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी आढळले तर सीबीएस मुंबई नाका, पाथर्डी फाटा येथे कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण विहीत मानकापेक्षा जास्त आढळले आहे.
नद्यांमध्येही प्रदुषण कायम
नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी,नंदीनी, वाघाडी आणि नंदीनी या चार नद्यांमधील प्रदुषणाचे मापन करण्यात आले. यात गंगापूर गाव, गोदापार्क (फॉरेस्ट नर्सरी पुल ) येथे गोदावरी नदीतील पाण्यामध्ये बायोकेमीकल ऑक्सीजन डिमांड चे प्रमार मानकापेक्षा कमी आढळले. आयटीआय पुल, सिटी सेंटर मॉल, समाज कल्याण विभाग कार्यालय याठिकाणी बीओडीचे प्रमाण मानकापेक्षा जास्त आढळले आहे. वाघाडी नदीतील पाण्याचे नमुने म्हसरूळ अमरधाम, जुना हत्ती पुल येथे तपासण्यात आले असता तेथे बीओडीचे प्रमाण हे कमाल मानकापेक्षा जास्त आढळले. तर विहीत गाव येथेही वालदेवी नदीच्या पाण्यात विहीत मानकापेक्षा जास्त बीओडीचे प्रमाण आढळले.
ध्वनी प्रदुषणात वाढ
कोरोना काळात वाहतुक बंद असल्याने ध्वनी प्रदुषणात घट झाल्याचे आढळले होते. मात्र महापालिकेच्या तपासणीत पंचवटी कारंजा आणि व्दारका चौफुलीवर ध्वनी प्रदुषण झाल्याचे आढळले आहे. व्यापारी पेठांमध्ये सकाळी ६५ तर रात्री ५५ डेसीबल मर्यादा असताना सातपुर एमआयडीसीत ७२ तर अंबड एमआयडीसीत ७० डेसीबल पेक्षा अधिक ध्वनी आढळला असून त्यामुळे ध्वनी मर्यादेचे उल्लंघनहोत असल्याचे देखील आढळले आहे.