सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीत ॲपे रिक्षामधून चोरीचा माल घेऊन जात असतांना मालक घटनास्थळी आल्याने चोरट्यांनी ॲपे रिक्षा व माल टाकून पळ काढल्याची घटना बुधवारी रात्री माळेगाव औद्योगिक वसाहतीत घडली. माळेगाव औद्योगिक वसाहतीतील श्रीराम इंजिनिअरिंग या कारखान्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धाडसी चोरी करत ॲपे रिक्षाच्या माध्यमातून कंपनीतील मशिनरी व सुटे भाग चोरून नेले. दुसऱ्या खेपेला कंपनीशेजारील टपरीधारकाच्या सतर्कतेने चोरट्यांना चोरीच्या मालासह वाहन सोडून पळ काढावा लागला. या घटनेत सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समजते.
माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये नवनाथ थोरात यांच्या मालकीची श्रीराम इंजिनिअरिंग ही कंपनी असून, रात्रीच्या सुमारास काही अज्ञात इसम ॲपे रिक्षा घेऊन कंपनीत आले. कंपनी बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी कंपनीच्या पाठीमागील बाजूचे पत्रे काढून आत प्रवेश करत वेल्डिंग मशीन, ग्राइंडिंग मशीन, ब्रेझिंग मशीन, कटर मशीन, हॅण्ड ग्राइंडर, ऑर्गन वेल्डिंग मशीन, हँड ड्रिल मशीन, लेथ मशीनचे सुटे पार्ट, दोन विद्युत मोटारी यांच्यासह इतर कामासाठी आलेले राऊंड बार ॲपे रिक्षात टाकून नेले. त्यापैकी काही मशिनरी घेऊन जाण्यासाठी पुन्हा दुसऱ्या खेपेस चोरटे ॲपे रिक्षासह कंपनीत आले. ही बाब संशयास्पद वाटल्याने कंपनीशेजारी असलेल्या टपरीधारक भिकन पाटील यांनी कंपनीचे मालक नवनाथ थोरात यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली असता थोरात यांनी लागलीच कंपनीत येऊन चोरट्याना रंगेहात पकडण्याचा प्रयत्न केला. तथापि, चोरट्यांनी वाहनासह मुद्देमाल जागेवर सोडून पळ काढला. थोरात यांनी कंपनीत जाऊन पाहणी केली असता सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात ॲपे रिक्षा ताब्यात घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शशी निकम, साहेबराव गायकवाड करीत आहेत.