नाशिक : नियोजन विभागाचा निधी पळविण्यावरून पालकमंत्री छगन भुजबळांच्या विरोधात दंड थोपटलेल्या शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी पुन्हा एकदा प्रहार केला आहे. भाई युनिव्हर्सिटीचे ते विद्यार्थी नसून प्राचार्य आहेत, अशी शेलकी टीका त्यांनी केली. पालकमंत्री पदावरून त्यांना दूर करण्याची मागणीही केली आहे.
विशेष म्हणजे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारीही पत्रकार परिषदेला उपस्थित असल्याने सेनेने भुजबळांच्या विरोधात आघाडी उघडल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे भुजबळ यांनी पुन्हा एकदा आरोपाचे खंडन करताना मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात योग्य तो निर्णय होईल, असे सांगून आपल्या पुरता वादावर पडदा पडल्याचे सांगितले.
नांदगाव तालुक्याचे आमदार कांदे हे भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांना पराभूत करून निवडून आले असून गेल्या आठवड्यात पावसामुळे नुकसान भरपाईच्या वेळी निधीवरून भुजबळ आणि कांदे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. नंतर हा वाद जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत मिटल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर कांदे यांनी निधीवरून उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. त्याला दोन दिवस उलटत नाही तोच याचिकेमुळे छोटा राजन टोळीकडून धमकवण्यात आल्याचा आरोप कांदे यांनी केला होता.
बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा त्यांच्यावर दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी अटी-शर्ती घालणाऱ्यांविरोधात शिवसेना मैदानात राहणार असल्याचे कांदे म्हणाले. त्यावर शिवसेनाप्रमुखांच्या अटकेचा विषय मागे पडला. बाळासाहेब ठाकरे यांचाही राग गेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही राग नाही, मग यांनाच राग का असा प्रश्न भुजबळ यांनी केला.
कांदे, छोटा राजनच्या पुतण्याला बजावणार समन्ससुहास कांदे यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलीस आयुक्तालयाने गंभीर दखल घेतली असून, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच कांदे यांच्यासह छोटा राजनचा पुतण्या आणि रिपाइं-आठवले गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांना शहर पोलिसांकडून जाबजबाब नोंदविण्यासाठी समन्स बजावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बालक पालकांचा वादशिवसेनेचे नेते आणि पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बालकांनी पालकांप्रमाणे आणि पालकांनी बालकांप्रमाणे वागू नये, असा सल्ला दिला. त्यावर भुजबळ यांनीही बालकांनी नाराजी व्यक्त केली तर ती घरातच असावी चव्हाट्यावर वाद करू नये, असे सांगितले. मी कोणाला धमकी देत नाही, फार तर विनंती करतो. त्यामुळे याबाबत तथ्य नाही. हा भुजबळ विरुद्ध सेना असा संघर्ष नाही. आघाडीत अशा प्रकारचे आरोप- प्रत्यारोप योग्य नाही असं छगन भुजबळ म्हणाले.