नाशिक- शहरातील बाजारपेठेत स्मार्ट सिटी कंपनीने रस्ते आणि जलवाहीनीच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आज झालेल्या महासभेत त्यावरून जेारदार वादंग झाला. स्मार्ट सिटी कंपनीच बरखास्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
महापालिकेची महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी संभाजी मोरूस्कर, शाहु खैरे, गुरमित बग्गा, अजय बोरस्ते यांनी शहरातील खेादकामावरून प्रशासनाला धारेवर धरले. शहराच्या मध्यवस्तीतील गावठाण भागात स्मार्ट सिटीने तर अन्य भागात खोदकाम करून नागरीकांना बेजार केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. व्यवसायिकांना आता व्यवसाय करणे कठीण झाले आहे, त्यामुळे खोदकाम त्वरीत थांबवावे तसेच कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली.
शहरातील अन्य भागात गॅस कंपनीने खोदलेल्या रस्त्यांवररूनही यावेळी वादळी चर्चा झाली. कंपनीने मंजुरी पेक्षा अधिक बांधकाम खोदून नियमभंग केला तसेच जेसीबीचा वापर केला असाही आरोप यावेळी करण्यात आला. या कंपनीवर तसेच शहर अभियंता संजय घुगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीच्या विषयावर स्वतंत्र महासभा बेालवण्यात येईल तसेच गॅस कंपनीने खेादलेल्या जागेवर त्वरीत खडीकरण करण्याचे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले.