नाशिक : हनुमाचे जन्मस्थान त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी की कर्नाटकातील किष्किंधा या मुद्द्यावरून धर्मसभेचा अक्षरश: आखाडा झाला. धर्मसभेची सुरुवातच उच्चस्थानी बसण्याच्या वादावरून झाली आणि बहिष्कार नाट्यानंतर प्रदीर्घ चर्चा होऊनही जन्मस्थानाचा मुद्दा बाजूलाच राहिला. चर्चा भरकटल्याने शंकराचार्यांच्या कथित अवमानावरून धर्मसभेत दोन महंतांमध्ये चांगलेच ‘रामायण’ घडले आणि कोणत्याही निर्णयाविनाच धर्मसभा गुंडाळण्यात आल्याने दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपाचे बाण सोडले जात आहेत.रामभक्त हनुमान यांच्या जन्मस्थळाचा वाद सध्या चर्चेत आल्याने यावर तोडगा काढण्यासाठी नाशिकरोड येथे महर्षी पंचायतन सिद्धपीठममध्ये महंत अनिकेत देशपांडे यांनी धर्मसभेचे आयोजन केले होते. सभेच्या सुरुवातीलाच नाशिकचे साधू-महंत आणि गोविंदानंद सरस्वती यांच्यात आसनावर बसण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. गोविंदानंद यांनी खाली बसूनच चर्चा करावी, अशी भूमिका घेत साधू-महंतांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. तब्बल दीड तासानंतर गोविंदानंद हे खाली बसण्यास तयार झाल्यानंतर धर्मसभेला सुरुवात झाली.
वेदमंत्र पठणानंतर धर्मसभेचे कामकाज सुरू झाले. यावेळी शांताराम शास्त्री भानोसे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, अनिकेत शास्त्री देशपांडे, मधुर गोपालदास जोशी, महंत सुधीरदास, श्रीनाथनंद, रामचंद्र गोपाळदास आदी साधू-महंत तसेच देवांग जानी यांनी अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे अनेक दाखले स्वामी गोविंदानंद यांना दिले. केंद्र सरकारच्या वेबसाइटवर असलेल्या सर्वेक्षणाचे दाखलेदेखील यावेळी सचित्र मांडण्यात आले. तरीही स्वामी गोविंदानंद हे वाल्मीकी रामायण हेच प्रमाण असल्याचे सांगत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने वाद अधिकच वाढत गेला.गोविंदानंद हे कोणतेही प्रमाण, पुरावे, दस्ताऐवज, शास्त्रातील उल्लेख मानण्यासच तयार नसल्यामुळे चर्चा एकतर्फी होणार असेल तर यावर कोणताच निर्णय होणार नसल्याच्या मुद्द्यावर नाशिककर साधू-महंतांनी गोविंदानंद यांना चांगलेच घेरले. अंजनेरीचा पुरावा मागणारे आपण कोण?आणि आपला काय अधिकार आहे अशी टोकाची चर्चा होऊ लागल्याने गोविंदानंदानाच आपली परंपरा आणि आपण कोणत्या आखाड्याचे आहात, असा प्रश्न साधू-महंतांनी केला. त्यावर त्यांनी चर्चा भरकटविण्याचा प्रयत्न केला आणि मूळ मुद्दा सोडून दिल्याने गोंधळ अधिकच वाढला. या गोंधळातच गेाविंदानंद आणि आपले गुरू द्वारकापीठाधिश्वर शंकराचार्य यांचा उल्लेख करतानाच महंत सुधीरदास यांनी शंकाराचार्य काँग्रेसधार्जिणे असल्याचा उल्लेख करताच गोविंदानंद भडकले आणि वादाच्या आखाड्यातच सारेच उतरले.