नाशिक : गेल्या ४८ तासांपासून जिल्ह्यात पावसाची कोसळधार सुरू असून दारणा धरणातून रविवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान १२ हजार ७८८ क्युसेक तर गंगापूर धरणातून सकाळपासून ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर आले आहेत. दरम्यान, गोदाकाठ भागातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्तीप्रसंगी रहिवाशांचे स्थलांतर करण्याची तयारी आपत्ती विभागाने केली आहे.
घोटी-इगतपुरीत संततधार
इगतपुरी/ घोटी : इगतपुरी तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने चांगलीच मुसंडी मारली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या साठ्यात बरीच वाढ झाली आहे. गेल्या ४८ तासांत तर पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपून काढल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत होते. रविवारी (दि.१२) दुपारी ३ वाजता १२ हजार ७८८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
दरम्यान पहाटेच्या सुमारास पावसाने काहीशी उसंत घेतली होती. मात्र, सकाळपासून पुन्हा धुवाधार पावसाने इगतपुरी तालुक्यातील नागरिकांची चांगलीच झोप उडविली. दुपारच्या सत्रात तर आभाळ फाटल्यागत पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी साचले होते, तर नालेही ओसंडून वाहत होते. गेल्या ४८ तासांत अर्थात सलग दोन दिवस पावसाची जोरदार बॅटिंग झाल्याने व बाजारपेठेत कमालीची शांतता जाणवत होती. मुसळधार पावसाच्या स्थितीने ग्राहकवर्गाने बाजारपेठांकडे पाठ फिरवली होती, तसेच वीकेंडचा कालावधी असूनही पर्यटकांचीही संख्या घटल्याचे चित्र दिसत होते, तसेच रस्त्यांच्या दुरवस्थेमुळेही बहुतांश पर्यटकांनी इगतपुरी तालुक्याकडे पाठ फिरवली होती.
इगतपुरी तालुक्यात गेल्या ४८ तासांत १४३ मिमी पावसाची नोंद झाली असून काल एका दिवसात ९८ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पश्चिम पट्ट्यात अर्थात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस होत असल्याने ओव्हरफ्लो झालेल्या धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
इगतपुरी तालुक्यात असलेल्या मोठ्या धरणांपैकी दारणा, भावली, भाम, कडवा ही धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. तर वाकी, मुकणे धरणातही बहुतांश जलसाठा वाढला आहे. वाकी धरण ६५ टक्के भरले असून मुकणे धरणही ६३ टक्के भरले आहे. दारणा धरणातून दहा हजार साठ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन दिवसांत धरणांमध्ये बराच जलसाठा उपलब्ध झाल्याने शेतकरी वर्गाची चिंता काहीशी दूर झाली.
धरणातील आजचा जलसाठा
दारणा धरण (ओव्हरफ्लो) - विसर्ग १२७८८ क्युसेक
भावली ओव्हरफ्लो
भाम ओव्हरफ्लो
कडवा ओव्हरफ्लो
वाकी खापरी - १६२९ दलघफू
मुकणे - 4606 दलघफू
------------------------------
मंडळनिहाय झालेला पाऊस
इगतपुरी ९८ मिमी
घोटी ६०.४० मिमी
धारगाव ७५ मिमी
वाडीव-हे २९.३० मिमी
नांदगाव बु. २१ मिमी
टाकेद - ४२ मिमी
इन्फो
पूर्वा नक्षत्राच्या अंतिम चरणाने झोडपले
पूर्वा नक्षत्राच्या अंतिम चरणात जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या २ ते ३ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. रविवारी जिल्ह्यात बऱ्याच भागात पावसाची संततधार सुरू होती. काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला. पूर्वा नक्षत्र सोमवारी (दि.१३) दुपारी ३ वाजून ६ मिनिटांनी संपत आहे. त्यानंतर सूर्य उत्तरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. उत्तरा नक्षत्राचे वाहनही पर्जन्यसूचक म्हैस असून या नक्षत्रातही चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पंचांगकर्त्यांनी मात्र या नक्षत्रात पाऊस मध्यम प्रमाणात तर काही भागात पिकांना उपयुक्त होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, उष्णतामानातही वाढीची शक्यता वर्तविली आहे.
=