गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट कमी झालेले असतानाही नाशिक शहरातील गणेश मंडळांनी स्वयंनिर्बंध घातले आणि स्वत:हून उत्सव औपचारिक स्वरूपात साजरे केले. यंदा दुसरी लाट ओसरली असून बहुतांश निर्बंध शिथिल झाल्याने यंदा बऱ्यापैकी उत्सवाची तयारी होत असताना मंडप धोरणाची मात्र मंडळांच्या दृष्टीने अडचणीची ठरली आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.१०) गणेश प्रतिष्ठापना होत असताना अवघ्या १२८ मंडळांनाच परवानग्या मिळाल्याने वादाची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळांवर एकूण ६५२ सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप उभारणीसाठीचे अर्ज केले होते, त्यापैकी ४०३ मंडळांचे अर्ज नाकारण्यात आले असून, १२८ मंडळांनाच मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
इन्फो..
गतवर्षीच्या तुलनेत अधिक अर्ज फेटाळले
गणेशोत्सवाकरिता पंचवटी विभागातील सर्वाधिक १८९ अर्ज महापालिकेला प्राप्त झाले. त्यापैकी ११४ अर्ज नाकारण्यात आले आहेत. ४९ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. नाशिक पूर्व विभागात १२२ पैकी ९७ मंडळांची परवानगी नाकारण्यात आली आहे. नाशिक पश्चिम विभागात ९३ अर्जांपैकी केवळ ८ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. सिडको विभागातून प्राप्त १३१ पैकी २८ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. सातपूर विभागात ६१ पैकी १० मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. नाशिक रोड विभागात ५६ पैकी अवघ्या १७ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी महापालिकेकडे ३७७ मंडळांनी मंडप उभारणीसाठी महापालिकेकडे अर्ज केले होते. त्यातील २३१ मंडळांची परवानगी नाकारून १४२ मंडळांना परवानगी देण्यात आली होती. तर चार मंडळांचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले होते. यंदा अर्जदार मंडळांची संख्या अधिक असली तरी परवानगीचे प्रमाण गतवर्षीपेक्षा कमी आहे.