पिंपळगाव बसवंत : येथील कांदा व्यापारी व आडतदारांनी बाजार समितीकडे परवाने परत करून शेतमाल खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कांदा व्यापारी असोसिएशनच्या कार्यालयाची तोडफोड केली. सदर प्रकार रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, या कार्यालयासमोरच हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने नागरिकांत सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.व्यापारी व आडतदारांच्या आठमुठेपणामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. व्यापारी व आडतदारांनी बाजार समितीतील शेतमाल खरेदीत उतरावे ही संघटनेची भूमिका होती; परंतु तसे न घडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घोषणाबाजी करीत पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापारी असोसिएशनच्या कार्यालयाची तोडफोड केली. व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्या आडत दुकानाची तोडफोड करण्याचीही तयारी होती, मात्र आडत दुकानातील कर्मचाऱ्यांनी सावध भुमिका घेत आडत बंद केल्याने अनर्थ टळला. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी व्यापार भवनाजवळ व्यापाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन करून घोषणाबाजी केली. या अचानक झालेल्या तोडफोड व घोषणाबाजीने उद्योग भवन परिसरातील व्यावसायिक व नागरीक बुचकळ्यात पडले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, दिपक पगार, संतोष गोराडे, साहेबराव मोरे, सोमनाथ बोराडे, रामकृष्ण चव्हाण, निलेश शिरसाठ, रामकृष्ण जाधव, सचिन अहिरे, शरद अहिरे, संतोष पगार, राजेंद्र पगार, संतोष बोऱ्हाटे, बाबाजी जाधव, मोहन जाधव, लक्ष्मण साळवे, नितीन पाटील, किरण देशमुख, शरद लभडे, विक्रांत गायधनी, निलेश कुसमारे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
कांदा व्यापारी असोसिएशनच्या कार्यालयाची तोडफोड
By admin | Published: July 17, 2016 11:38 PM