नाशिक : दरवर्षी पारंपरिक उत्साहात साजऱ्या होणाºया गणेशोत्सवावर यंदा जाचक नियमावलींचे विघ्न असून, रस्ता रुंदीचे नियम आणि खड्डे खोदण्यास अन्य अनेक अटींमुळे मंडळांना उत्सव साजरा करणे कठीण होणार आहे. वर्षातून एकदा दहा दिवसांसाठी होणाºया उत्सवासाठी विघ्न येत असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
नाशिकमध्ये अन्य कोणत्याही सणांपेक्षा सर्वाधिक उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. नवरात्र किंवा दहीहंडी हे सण त्यातुलनेत उत्साहाने साजरे केले जात नसले तरी गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवांवर सातत्याने निर्बंध येत आहेत. नाशिकमध्ये सध्या गणेशोत्सवाची तयारी सुरू असतानाच महापालिकेने न्यायालयाच्या आदेशासंदर्भातील निर्बंध जाहीर करण्यासाठी बैठक बोलाविली होती ती होऊ शकली नसली तरी महापालिकेने संकेतस्थळावर रस्त्यावरील उत्सवांची नियमावली तयार केली आहे. त्यानुसार रस्त्यांवर मंडप उभारणी करताना रस्त्यांच्या एकचतुर्थांश जागेतच मंडपाची उभारणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी मुळातच आधी परवानगी सक्तीची असून, परवानगीशिवाय मंडप उभारणीसाठी परवानगीच दिली जाणार नसल्याने ती अधिक महत्त्वाची अट असणार आहे. प्रतिमंडप साडेसातशे रुपये शुल्क तर भरावे लागणार आहे. परंतु हे करताना महावितरण, अग्निशमन दल यांचा ना हरकत दाखला घेतल्यानंतर पोलीस ठाण्याकडून परवानगी मिळणार आहे. इतकेच नव्हे तर खड्डे खोदण्यासाठीदेखील परवानगी लागणार आहे.
मंडप उभारणीसाठी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून महापालिका आणि जिल्हा प्रशासन परवानगी देणार आहे. मंडप उभारणीसाठी शहरातील मध्यवती मंडळे म्हणजेच जुने नाशिक गावठाण भागात रुंद रस्ते नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी मंडप उभारताना एकचतुर्थांश भागातच मंडप उभारणे शक्य नाही. काही ठिकाणी रस्ते इतके छोटे आहे की, छोट्यात छोटा मंडप बांधला तरी रस्ता रहदारीसाठी बंद होऊन जातो. अशावेळी मंडपासाठी रस्ता बंद करण्यास महापालिका यंदा उच्च न्यायालयाच्या नियमांना शिथिल करण्यास तयार होईल काय हाच खरा प्रश्न आहे.......उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने याआधीच खड्डे खोदण्याबाबत निर्बंधांचे धोरण ठरविले असून, त्यानुसार रस्त्यात बेकायदा खड्डे खोदल्यास दंड करण्यात येणार आहे. त्यानुसार मोठ्या खड्ड्यासाठी पन्नास हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळे अधिक अस्वस्थ आहेत.