नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांनी यंदा शाडू मातीच्या सहाशे गणेशमूर्ती तयार केल्या असून, ४ सप्टेंबरपासून कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील प्रगती विक्री केंद्रात विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत. दोन ते तीन फुटांच्या छोट्या व आकर्षक गणेशमूर्ती बंदी बांधवांनी घडविल्या आहेत. शिक्षा भोगणाऱ्या बंदीजनांचे पुनर्वसन करण्यासाठी कारागृहात विणकाम, सुतारकाम, लोहारकाम, रसायन, बेकरी, धोबीकाम, शिवणकाम, चर्मकला, मूर्तिकाम असे नऊ कारखाने आहेत. कारखान्यात काम केल्यानंतर त्यांना वेतन दिले जाते. या कारखान्यांमुळे कारागृहाला मोठा महसूलही मिळतो. सन २०१७ मध्ये येथे शाडू मातीच्या दीडशे गणेशमूर्ती बंद्यांनी घडविल्या. त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. २०१८ ला एक हजार सुबक मूर्ती बनविण्यात आल्या. त्यातून १३ लाखांचा महसूल मिळाला. २०१९ मध्ये आठशे गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली बारा फुटांची आकर्षक मूर्ती होती. त्यावर्षी ११ लाख ३६ हजारांचा महसूल मिळाला. २०२० मध्ये कोरोना महामारी आली असतानाही विविध आकारातील ५५० गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या. त्यातून ७ लाख ३५ हजार मिळाले.
यावेळी सहाशे मूर्ती तयार करण्यात आल्या असून, त्यामध्ये मूषक वाहक, मोरेश्वर, टिटवाळा, कमळ, पान आसन, आसन गणेश, दगडूशेठ, गादी गणेश, लंबोदर, वक्रतुंड, गजमुख, बालाजी, उंदीर रथ, राधाकृष्ण, शंकरपार्वती गणेशमूर्तींचा समावेश आहे. शासनाच्या कोविड नियमानुसार लहान मूर्तींवर यंदा भर देण्यात आला आहे. कोरोना संकटामुळे काही कुशल बंदी पॅरोलवर घरी गेले असतानाही डिसेंबरपासन मूर्तिकाम सुरू होते. माफक दरातील या गणेशमूर्तींसोबत पाट, रुमालही मोफत देण्यात येणार आहे.
अपर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ, कारखाना व्यवस्थापक एस. ए. गीते, वरिष्ठ कारागृह अधिकारी अशोक कारकर, प्रशांत पाटील, अभिजित कोळी, मुकेश पाटील, भगवान महाले यांच्या मार्गदर्शनाखाली बंद्यांनी मूर्ती तयार केल्या आहेत.
250821\25nsk_35_25082021_13.jpg
कारागृहात तयार झालेल्या मूर्ती विक्रीसाठी आणतांना बंदीबांधव