नाशिक : गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारात कांद्याचे दर कोसळू लागल्याने किरकोळ बाजारातही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कमी दाबाने पाणीपुरवठा
नाशिक : शहरातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिकेने पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. कमी दाबामुळे महिलांना पाण्यासाठी ताटकळत बसावे लागते.
पेठ रोड परिसरात अस्वच्छता
नाशिक : पेठ रोडवरील काही भागांत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने या परिसरात स्वच्छता करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शहरातील रुग्णालयांमध्ये गर्दी
नाशिक : शहरात विविध साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून अनेक डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. नागरिकांनी शक्यतो पाणी उकळून प्यावे, त्याचबरोबर बाहेर फिरताना तोंडाला मास्क लावावा, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
साखर कारखाने सुरू करण्याची मागणी
नाशिक : जिल्ह्यातील बंद साखर कारखाने सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कारखाने बंद असल्याने येथील शेतकऱ्यांना परजिल्ह्यातील कारखान्यांवर अवलंबून राहावे लागते.
मनुके तयार करण्याचा निर्णय
नाशिक : द्राक्षाला कमी दर मिळत असल्याने अनेक उत्पादकांनी मनुके तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मनुक्याला चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
सरस रोडवर अतिक्रमण
नाशिक : शहरातील व्दारका परीसरातील सर्विसरोडवर अनेक ठिकाणी गॅरेजचालकांनी अतीक्रमण केल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावरच गाडी दुरुस्ती केली जात असल्याने या ठिकाणाहुन वाहन चालविणे जिकरीचे होते याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पथदिप बंद असल्याने गैरसोय
नाशिक : गांधीनगर परीसरातील अनेक पथदिप बंद असल्यामुळे रात्रीच्यावेळी या परिसरात अंधाराचे साम्रा्ज्य पसरते. अनेक नागरिक सायंकाळी या ठिकाणी फिरायला येत असतात. त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. पथदीप सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने नाराजी
नाशिक : बांधकाम साहित्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकांचे घरबांधणीचे बजेट कोलमडले आहे. यामुळे अनेकांनी बांधकाम करण्याचा निर्णय स्थगित केला असल्याचे दिसून येत आहे. ज्यांची कामे सुरू आहेत, त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.