नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठविण्यात आलेल्या १११ कोटींच्या प्रस्तावांना मोठी कात्री लागल्यानंतर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून, बुधवारी (दि. २३) बहुतांश सदस्यांनी याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांच्याकडे विचारणा केल्याचे समजते.जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत जिल्हा नियोजन समितीकडे जिल्हा परिषद सदस्यांनी केलेली मागणी तसेच ग्रामपंचायतींनी केलेल्या मागणीनुसार तयार केलेले प्रस्ताव असे सुमारे जवळपास १११ कोटींचे प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे मंजुरीसाठी पाठविले होते. त्यातील अवघ्या १४ कोटी ९८ लाखांच्याच प्रस्तावांसाठी जिल्हा नियोजन समितीने तरतूद केल्याचे समजते. त्यातही ही १४ कोटी ९८ लाखांपैकी १३ कोटी ६४ लाखांपर्यंत खाली आल्याने बुधवारी दिवसभर जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चा होती. त्यातही ज्या काही १३ कोटींच्या कामांना जिल्हा नियोजन मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यात बहुतांश कामे ही सत्ताधारी आमदार व जिल्हा परिषद सदस्यांचीच असल्याचीही चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होती. कॉँगे्रससह राष्ट्रवादी कॉँग्रेस सदस्यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडे सुचविलेली बहुतांश कामे या कात्रीत अडकून अगदी बोटांवर मोजण्याइतकीच विरोधकांची कामे मंजूर झाल्याचे बोलले जात असून याच कारणावरून जिल्हा नियोजन मंडळातील एक वरिष्ठ अधिकारी आठवडाभर रजेवर गेले आहेत. आता जनसुविधेच्या कामांना कात्री लागल्यानंतर आपली किती कामे झाली, किती नामंजूर करण्यात आली, याची माहिती घेण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषद सदस्यांनी अध्यक्ष कार्यालयात चकरा मारल्याचे कळते. याबाबत येत्या काही दिवसात मंजूर नामंजूर कामांवरून वादळ उठण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
जनसुविधेच्या कामांवरून सदस्यांमध्ये असंतोष
By admin | Published: December 24, 2015 12:04 AM