नाशिक : शहरात गेल्या काही दिवसांत ऑनलाइनवरून फसवणूक झाल्याच्या प्रकारांमध्ये वाढ झालेली आहे. एटीएमकार्डच्या माध्यमातून फसवणूक झालेली आहेच. शिवाय, वाहनविक्रीचे आमिष दाखवूनही अनेकांची फसवणूक झाली आहे. बनावट कागदपत्रे तयार करून कर्जप्रकरणे तसेच जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याची प्रकरणेदेखील घडली आहेत.
बालकलाकार लावण्या धारणकरचा सत्कार
नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिर येथे पार पडलेल्या सोहळ्यात बालकलाकार लावण्या धारणकर हिला उत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरविण्यात आले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते लावण्याचा सत्कार करण्यात आला. तिने दोन लघुपटांमध्ये भूमिका साकारली आली.
वाहतूक बेटावरील पुस्तक शिल्क दुर्लक्षित
नाशिक : शहरातील टिळकवाडी सिग्नल येथे सायकल ट्रॅकचे काम सुरू आहे. या मार्गावर कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या पुस्तकांचे शिल्प उभारण्यात आलेले आहे. परंतु, येथील खोदकाम तसेच रस्ताकामामुळे शिल्पावर धूळ बसली असून, त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. नाशिकमध्ये मराठी साहित्य संमेलन भरत असताना कुसुमाग्रजांच्या साहित्य शिल्पाची दुर्दशा झाली, त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. नाट्य समीक्षक चारुदत्त दक्षित यांनी या समस्येकडे मनपाचे लक्ष वेधले आहे.
दिव्यांग वधूवर परिचय मेळावा
नाशिक : राजेंद्र पारख इलेक्ट्रॉनिक्स व लायन्स क्लब ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.२५ रोजी दिव्यांग वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. रोटरी हॉल गंजमाळ येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी नावनोंदणी महात्मा गांधी रोडवरील राजेंद्र पारख इलेक्ट्रॉनिक्स येथे केली जात आहे.
स्मृतिगंध स्मरणिकेचे प्रकाशन
नाशिक : स्व. प्राचार्य रामदाद आंबेकर यांच्या आठवणींवर आधारित तयार करण्यात आलेल्या ‘स्मृतिगंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. भगूर येथील संत धनाजी सभागृहात या कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. स्मरणिकेचे प्रकाशन दिलीप क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिता करंजकर होत्या. यावेळी फेसकॉमचे संघटन सचिव उत्तम तांबे, संघाचे प्रांतसंघचालक नानाजी जाधव, प्रमोद आंबेकर यांची भाषणे झाली. चारुदत्त दीक्षित यांनीही मनोगत व्यक्त केले. श्रीराम कातकाडे यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. मृत्युंजय कापसे यांनी सूत्रसंचालन केले.
(फाेटो)