नाशिक : शहरातील सार्वजनिक कार्यक्रम, विवाह समारंभ यांना गर्दी वाढू लागली आहे. काही ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक कार्यक्रम आयोजकांनी याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
टाकळीत अवजड वाहनांची वाहतूक वाढली
नाशिक : टाकळी गावातून अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. येथील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्ती आहे. याशिवाय लहान मुले रस्त्यावर खेळत असतात. पादचाऱ्याचीही वर्दळ असते. यासाठी अवजड वाहनांना वेळेची मर्यादा घालून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
झाडांजवळील रिप्लेक्टरची दुरवस्था
नाशिक : शहरातील काही मार्गांवर असलेल्या झाडांजवळ लावण्यात आलेल्या रिप्लेक्टरची दुरवस्था झाली आहे. यामुळे रात्रीच्यावेळी वाहनचालकांची दिशाभूल होते. अंधारामळे अनेक दुचाकीचालकांना समोर झाड असल्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील रिप्लेक्टरची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीस अडथळा
नाशिक : मालेगाव स्टॅण्ड येथून पेठरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर मखमलाबाद नाका येथे नेहमीच वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या ठिकाणी रस्ता अरुंद असून तीनही बाजूने वाहने येत असतात. त्यात एखादे मोठे वाहन आले तर ते जाईपर्यत वाहनांची मोठी रांग लागते. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
विहिरींनी तळ गाठल्याने चिंता
नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही गावांमध्ये आतापासूनच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पाण्याच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. मात्र आता पाणी कमी पडू लागल्याने पीक येईल की नाही याची शास्वती राहिली नाही. पालखेड डाव्या कालव्याला रोटेशन सोडण्याची मागणी होत आहे.
उड्डाणपुलाखाली भिकाऱ्यांचे अतिक्रमण
दुभाजकांमधील झाडे वाढल्याने चिंता
नाशिक: शहरातील द्वारका चौक ते आडगाव पर्यंत उड्डाणपुलाखालील जागेवर भिकाऱ्यांनी अतिक्रमण केले असून रात्रीच्यावेळी हे भिकारी तेथेचे झोपतात यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. याबाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
नाशिक : फेम चौक ते अगर टाकळी रस्त्यावरील दुभाजकामध्ये असलेली झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत यामुळे पथदिव्यांचा प्रकाश पूर्णपणे रस्त्यावर पडत नाहीत. यामुळे या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य असते. या झाडांची छाटणी करावी, अशी मागणी त्रस्त वाहनचालकांनी केली आहे.